उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेले मनमाड हे शिवसेनेचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे जिल्हय़ातील महत्त्वाचे स्थानक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम प्रेम या शहराला अनुभवयास मिळाले. या जिव्हाळ्याला गरीब-श्रीमंतीची, जातीपातीची, लहान-मोठेपणाची झालर नव्हती. शेकडो कार्यकर्ते घडले. ज्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल असे पद त्यांना मिळत गेले. आज शिवसैनिकांचा आधारवडच गेला.
बाळासाहेबांच्या मनमाडमध्ये १९८५-९० व ९५ मध्ये तीन सभा झाल्या. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक जिल्हय़ात अनेक शाखा सुरू झाल्या. तशाच प्रकारे मनमाडही अनेक घटनांचे साक्षीदार राहिले. साहेबांच्या आदेशावरून साबिर शेख, बबन घोलप, राजाभाऊ गोडसे हे त्यावेळेचे प्रमुख नेते मनमाडला येत. अशोकअण्णा रसाळ, अनिल तोंडे, दिलीप सोळसे, राजाभाऊ छाजेड, राजाभाऊ देशमुख यांची भेट घेत. मग शाखाविस्ताराचे निर्णय घेतले जात. एखादा निर्णय झाला की शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत ते काम पूर्ण करायचे.
१९८५, १९९० मध्ये अशोक रसाळ यांना नांदगावची उमेदवारी दिल्यानंतर मतांचा आकडा पाच हजारांच्या आतच राहिला. १९९५ मध्ये राजाभाऊ देशमुखांसारख्या अत्यंत सामान्य परिस्थितीतल्या कार्यकर्त्यांने शिवसेनेला आमदारकी मिळवून दिली. त्यासाठी कारणीभूत ठरली बाळासाहेबांची ‘रेकॉर्डब्रेक’ सभा. नंतरही तसेच झाले. संजय पवार चौथी शिकलेला, टेलरिंगची कामे मजुरीने करणारा, दूध विकणारा, नागापूरसारख्या खेडय़ात राहणारा, परंतु कडवट शिवसैनिक. साहेबांनी त्यास उमेदवारी दिली आणि २००५ च्या निवडणुकीत याआधीचे मतांचे सर्व विक्रम मोडत पवार आमदार झाले. कार्यकर्त्यांचे कष्ट त्यासाठी कामी आले.
मनमाडच्या अल्ताफ खानवर साहेबांचा विशेष जीव. ‘खानबाबा’ म्हणून परिचित अल्ताफ यांची परिस्थिती अगदीच सामान्य. ३०-३५ वर्षांपासून निष्ठेने सेनेचं कार्य करणाऱ्या खानबाबाला जिल्हाप्रमुखपद काय सहसंपर्क नेतेपदही साहेबांनी दिले. ठिकठिकाणच्या जाहीर सभांमधून साहेब कायम अल्ताफचे उदाहरण देत. ‘शिवसैनिक असावा तर आमच्या निष्ठावान अल्ताफसारखा’ असे ते म्हणत. सेनाप्रमुख अस्वस्थ झाल्यापासूनच अल्ताफच्या घरात आठवडय़ापासून अन्न शिजलेले नाही. अजूनही ते मुंबईतच आहेत.
३० वर्षांपासून सेनेचे निष्ठेने कार्य करणाऱ्या माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड यांची तब्येत काही वर्षांपूर्वी कमालीची ढासळली. १९९८ मध्ये साहेबांनी छाजेडांची हिंदुजारुग्णालयात उपचाराची सर्व व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर, स्वत: साहेब रुग्णालयात तासभर छाजेडांच्या जवळ बसून होते. गळ्यातल्या रुद्राक्षांची माळ त्यांनी अंगावरून फिरविली होती. ‘बरा झाल्यावर भेटायला ये’ असे सांगत रुग्णालयाचा सर्व खर्च त्यांनी स्वत: केला. छाजेडांचे संपूर्ण कुटुंब आज दु:खसागरात बुडाले आहे. त्यांच्या डोळ्यांतल्या पाण्याला खळ नाही.
सोने-चांदीच्या दागिन्यांचा मजुरीचा व्यवसाय असणाऱ्या दिवंगत सुरेश बागूल यांच्यावरही साहेबांचा असाच लोभ. लग्नानंतर पहिला मुलगा झाला. बारसं केलं नाही. थेट साहेबांकडेच बागूल पती-पत्नी गेले. मातोश्रीवर बागुलांच्या मुलाचं ‘पवन’ नाव ठेवत साहेबांनी या कुटुंबाला आशीर्वाद दिला. मीनाताईंनी पत्नी संगीता बागूल यांची ओटी भरली. साहेबांच्या या आठवणीने संगीता व पवनच्या डोळ्यांमध्ये वारंवार अश्रू उभे राहत आहेत.
मनमाड शहर शिवसेना शाखेच्या उभारणीत माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसेंचा सिंहाचा वाटा. नगराध्यक्ष झाल्यावर साहेबांच्या पायावर डोकं ठेवत सोळसे यांनी, ‘आमच्यासारख्या खालच्या जातीतल्या मोलमजुरीचं काम करणाऱ्यास आज या शहराचं तुम्ही प्रथम नागरिक बनवलं. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं’ असे उद्गार काढले होते. तत्कालीन तालुकाप्रमुख सुनील जगताप यांच्या घरी राजाभाऊ देशमुखांच्या प्रचाराच्या वेळी साहेबांचा मीनाताईंसह मुक्काम होता. सुनीलच्या पाठीवर हात ठेवत साहेब म्हणाले, ‘तुझ्यासारख्या ध्येयवेडय़ांच्या जिवावर तर माझी शिवसेना चालतीय. लढ, असाच लढत राहा..’
असे संबंध असल्यामुळेच मनमाड शहरातील शिवसैनिक तीन-चार दिवसांपासून सुन्न आहेत. ‘पोरकं केलं हो आम्हाला’ असे डिजिटल फलक लावून शोक करीत बसण्याशिवाय त्यांच्या हातीही आता काही राहिलेलं नाही.