येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित ११व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन ४, ५ आणि ६ जानेवारी २०१३ रोजी करण्यात आले आहे.
गेली १० वर्षे रसिकांच्या आणि आश्रयदात्यांच्या पाठबळावरच बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे ११वे वर्ष आहे. बालगंधर्वाचे जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. इतकेच नव्हे तर बालगंधर्वानी स्थापन केलेल्या ‘बालगंधर्व नाटक मंडळी’चे हे शताब्दी वर्ष आहे. असा हा दुर्मीळ योग प्रतिष्ठान रसिकांच्या साक्षीने साजरा करणार आहे.
सायंकाळी ७ ते १० या वेळेत एकूण ६ सत्रांत हा महोत्सव सादर होणार आहे आणि दरवर्षांप्रमाणेच याही वर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने होणार असून, मोहन टाकसाळे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अरिजित बासू (प्रबंध व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक), अशोक जैन (उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.) व डॉ. जगदीश पाटील, आय. ए. एस. (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ) यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवाचे प्रथम सत्र गायक उस्ताद अस्लम खाँसाहेब यांच्या हस्ते शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाने सुरू होणार आहे.
द्वितीय सत्रात पद्मश्री पंडित काद्री गोपालनाथ (चेन्नई) व पं. रोणू मुजुमदार (मुंबई) यांची सॅक्सोफोन व बासरीची जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे. पाश्चिमात्य वाद्यावर अभिजात संगीताचे सादरीकरण हे एक अविस्मरणीय सत्र प्रतिष्ठानने खास तरुण पिढीसाठी आयोजित केले आहे.
दुसऱ्या दिवसाचे प्रथम सत्र प्रख्यात पक्र्युशनिस्ट पं. त्रिलोक गुर्टू यांच्या विविध तालवाद्याने सुरू होणार आहे. पं. त्रिलोक गुर्टू तबला आणि विविध जाझ इन्स्ट्रमेंट्स वाजवतात.
द्वितीय सत्रात नृत्यकलेची परंपरा पुढे चालविणारे प्रख्यात पं. बिरजू महाराजांचे बंधू पं. राममोहन महाराज (दिल्ली) यांचा पदन्यास होणार आहे. त्यांना साथ उस्ताद साबीर खान (दिल्ली) तबल्यावर देणार आहेत.
तिसऱ्या दिवशी प्रथम सत्रात पुनश्च एकदा गंधर्वी स्वरसरितेचा अनुभव जळगावकर रसिक घेणार आहेत. बालगंधर्वाच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सव व गंधर्व नाटक मंडळीची शताब्दी वर्षांनिमित्त सादर होणार आहे आणि तो म्हणजे ‘तो राजहंस एक’ हा विशेष कार्यक्रम. ऑडिओ, व्हिज्युअल माध्यमातून बालगंधर्वाच्या गायकीचा आस्वाद त्यांच्या नाटय़पदांच्या माध्यमातून पं. अतुल खांडेकर (पुणे) आणि सहकारी सादर करतील. बालगंधर्वाना ऑर्गनवर साथसंगत करणारे हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव संजय देशपांडे हे ऑर्गनवर साथ करणार आहेत.
समारोपाच्या सत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास असलेले प्रख्यात तबलावादक उस्ताद तारी खान यांच्या तबला सोलोने ११व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रख्यात निवेदिका मंगला खाडिलकर संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार आहेत.