दिगंबर शिंदे

नटश्रेष्ठ बालगंधर्व यांनी ज्या रंगभूमीवर अभिनयासाठी पहिले पाऊल टाकले त्या मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचे बांधकाम होऊन एक तप झाले तरी अद्याप योग्यता प्रमाणपत्र नसताना केवळ दुरुस्तीसाठी ९८ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. तरीही नाट्यगृहाचा आत्मा समजल्या जाणारी सक्षम ध्वनी यंत्रणा उभारण्यात यश आलेले नाही.

नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी ज्या रंगभूमीवर अभिनयासाठी पहिले पाऊल टाकले ते  बालगंधर्व नाट्यगृहाची अधिकृतपणा लाभण्यापूर्वीच दुरवस्था झाली आहे. महापालिका स्थापनेनंतर मिरजेतील नाट्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेउन आणि बालगंधर्वांची ऐतिहासिक परंपरा नाट्यकर्मींना प्रेरणादायी ठरावी या हेतूने २००८ मध्ये सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत नाट्यगृह उभारण्यात आले. यासाठी निश्चित केलेला आराखडा पूर्ण न करता नाट्यगृह रसिक सेवेसाठी सज्ज असल्याचे सांगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.

तथापि, नाट्यगृहामध्ये एखादी दुर्घटना घडली तर याठिकाणी आत येण्यासाठी जसा मार्ग आहे तसा बाहेर पडण्यासााठी मार्ग असणे बंधनकारक आहे. आराखड्यामध्ये तसा मार्गही दाखविण्यात आला आहे. मार्ग दर्शनी भागात असलेले व्यावसायिक गाळे दूर कोणी करायचे या वादात हा मार्गच खोळंबला आहे. हा अडथळा दूर करण्याची इच्छाशक्तीचा नाही. नाट्यगृहाला पूर्णत्वाचा दाखला देण्यास यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हरकत नोंदवली आहे. हा अडथळा बाजूला केल्याविना परिपूर्ण नाट्यगृह होऊ शकत नाही हे ज्ञात असतानाही याच ठिकाणी देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा नाट्यरसिकांचा सवाल आहे.

या नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महसूल विभागाची ना असण्याचे कारणच नाही. तरीही स्थानिक कलाकार या ठिकाणी सातत्याने एखादा कार्यक्रम घेऊन नाट्यकला जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात.

या कलाकारांची सक्षम ध्वनी यंत्रणेची मागणी लक्षात घेउन मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ९८ लाखांची कामे निश्चित करण्यात आली होती. यातून नाट्यगृहातील बैठक व्यवस्था बदलणे याबरोबरच ध्वनी यंत्रणा अद्ययावत करणे ही मुख्य कामे होती. मात्र उधळपट्टीची सवय झालेल्या प्रशासनाने ध्वनी यंत्रणेलाही हातही न लावता रंगरंगोटीवर खर्च केला. यामुळे मूळ दुखणे कायमच आहे. प्रस्तावित आराखड्याप्रमाणे निधी मंजूर झाला असताना कामेही अपूर्णच राहिल्याने आणखीन वाढीव निधीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बालगंधर्वसाठी २२ लाख रुपयांच्या वाढीव निधीचा प्रस्ताव असल्याने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून केवळ मलमपट्टी सुरू असल्याचा आरोप मिरजकर नागरिकांतून होत आहे.

९८ लाख रुपये खर्चूनही नाट्यगृहाचा पडदा उघडू शकला नाही. अद्याप काही कामे अपूर्णच आहेत. महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या बक्षीस स्वरूपातील पॅकेजमधून बालगंधर्व नाट्यगृह ९८ लाख आणि लक्ष्मी मार्केटच्या  इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी कोठे, कसा आणि किती खर्ची पडला, याचा हिशोब मात्र कोणीही देण्यास तयार नाही.

बालगंधर्व नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ९८ लाख रुपयांचा निधी ळिाला. त्यामध्ये रंगरंगोटी, खुच्र्या, ध्वनी व्यवस्था, विद्युतीकरण यासह अनेक कामांचा समावेश होता. यापैकी केवळ खुच्र्या बदलण्यात आल्या आहेत. वास्तविक २५० खुच्र्या बदलण्याचा प्रस्ताव होता. मात्र, ६०० खुच्र्या बदलण्यात आल्या. याशिवाय नवीन ध्वनिवर्धकाच्या खरेदीसाठी १४ लाखांचा प्रस्ताव होता.

मात्र, सद्य:स्थितीला एक पैसाही शिल्लक राहिला नाही. स्थानिक रंगकर्मींनी याबाबत चौकशी केली असता, नाट्यगृहाची गळती काढावी लागल्याने अन्य कामांवर निधी खर्च झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नाट्यगृहाच्या गळतीवरच लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक रंगकर्मींशी चर्चा करून त्यांचा सल्ला न घेता नाट्यगृहात अनेक अनावश्यक बदल केल्याचा आरोप होत आहे. बालगंधर्व नाट्यगृहाची बहुतांशी कामे प्रलंबित आहेत. आता उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांध्ये वाढीव निधीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लक्ष्मी मार्केट  इमारतीला पुन्हा एक कोटी आणि बालगंधर्वसाठी पुन्हा २२ लाख रुपयांच्या निधीसाठी ताजा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वास्तविक वाढीव निधीची तरतूद करण्यापेक्षा मंजूर आराखड्याप्रमाणे निधी उपलब्ध करूनही कामे का पूर्ण झाली नाहीत, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

मुळात बालगंधर्व नाट्यगृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण याच नाट्यगृहामध्ये नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचे रंगभूमी पदार्पणाची सुरुवात झाली होती. नाट्यगृहाच्या निमित्ताने बालगंधर्वांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न महापालिकेने करणे यामध्ये अयोग्य काहीच नाही. मात्र नाट्यगृहाची उभारणी करीत असताना जो आराखडा मंजूर करण्यात आला होता त्या आराखड्यानुसार काम झालेले नाही. तसेच या नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम  सादर करण्यास अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने ना हरकत दिलेली नाही. यामुळे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही केवळ मूळ सांस्कृतिक कार्यक्रमच याठिकाणी सादर होऊ शकत नसतील तर खर्च केलेला निधी पाण्यातच गेला असे समजले तर त्यात वावगे ते काय?

नाट्यगृहाला महसूल विभागाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी दिली असून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नाही. ध्वनी व्यवस्था चांगली करण्याची नाट्यकर्मींची मागणी रास्त असून महापालिका यावर लवकरच निर्णय घेईल.

– पांडुरंग कोरे, स्थायी समिती सभापती.

नाट्यगृहाचा आत्मा म्हणजे ध्वनी व्यवस्था, हीच यंत्रणा जर कुचकामी असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही नाट्यगृह नांदते ठेवणे अशयय आहे. बालगंधर्वांच्या नावाला साजेसे नाट्यगृह हवे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे.

– धनंजय जोशी, अभिनेते, व इंद्रधनू नाट्य चळवळीचे अध्यक्ष.