हागणदारीमुक्त योजनेत बल्लारपूर हे विदर्भात प्रथम आले असून आता या पुढचा टप्पा गाठायचा आहे. बल्लारपूर, मूल, व पोंभूर्णा हे तीनही तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त करून २०१९ पर्यंत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासोबतच देशातील पहिले हरित क्षेत्र म्हणून बल्लारपूरला ओळख प्राप्त करून देणार असल्याचा निर्धार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बल्लारपुरातील २४ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. बल्लारपुरातील प्रत्येक विकासकामाचे भूमिपूजन त्या त्या वार्डामधील पाच नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. बल्लारपूर पालिका ते कॉलरी गेट अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीट रस्ता १५ कोटी ५ लाख, वनविभागाच्या जंगलाला पेपर मिलच्या टाकाऊ डेपोपासून ते कारवा-जुनोना रस्त्याला जोडणाऱ्या समतल चराच्या कडेने संरक्षण भिंतीचे बांधकाम ४ कोटी १ लाख ४० हजार व बल्लारपुरतील कुळमेथे लेआऊट, चापशी जोशी लेआऊट, मोगरे लेआऊट, मोरे लेआऊट, विद्यानगर लेआऊट व सुचकनगर लेआऊटमधील मोकळ्या जागेचा विकास ४ कोटी ७७ लाख १७ हजार, असे एकूण २३ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपये खर्चाच्या विकासकामांचा यात समावेश आहे. मोकळ्या जागेचा विकास करतांना संरक्षण भिंत बांधणे, पदपाथ, योगाशेड, बगीचा विकास व ओटा बांधकाम करण्यात येणार आहे.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, आपण निवडून आलो तेव्हा बल्लारपूरच्या विकासासाठी १०० कोटी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त निधीची कामे आता सुरू आहेत. शहरात भव्य मार्केट उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले. बल्लारपूरसाठी ४० कोटींची पाणी पुरवठा योजना बनविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. नाटय़गृहाचे काम सुरू असून सहा महिन्यात उद्घाटन होईल. बल्लारपूर पालिकेची शाळा उत्कृष्ट करण्यासह बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी टाटा कंसल्टंसीच्या मदतीने या क्षेत्राचा रोजगार आराखडा तयार करण्यात येत असून या भागात लघू व मोठय़ा उद्योगातून रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. १ जुलैला राज्यात २ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या कार्यक्रमाला बल्लारपूर मतदारसंघात जास्तीतजास्त वृक्ष लावून ग्रीन बल्लारपूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.