|| नितीन बोंबाडे

डहाणूतील उद्योजकांकडून नैसर्गिक वायू जोडणीची मागणी

 

डहाणू :  उद्योग बंदी कायदा आणि लाल पट्ट्यामुळे डहाणू तालुक्यात २९ वर्षांपासून उद्योगनिर्मिती आणि त्याचा विकास झालेला नाही.  तालुक्यात नैसर्गिक वायूचा वापर केल्यास उद्योगांना नवी भरारी घेता येणे शक्य आहे. गुजरातच्या उंबरगावपर्यंत नैसर्गिक वायूवर अनेक उद्योग सुरू आहेत, असे असताना डहाणू तालुक्यात ते का नाही? असा प्रश्न उपस्थित करून नैसर्गिक वायू जोडणीची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या डहाणूत सन १९९१ ला पर्यावरण प्राधिकरणाची स्थापना करून उद्योग बंदी केली गेली. आजच्या घडीला डहाणूला फुग्याचे ५० हून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत.  चिंचणी वासगाव, गुंगवाडा, वडकून, वाणगाव येथे १०० हून अधिक डायमेकिंगचे व्यवसाय चालतात. कारखान्याला लागणारे पाणी विकत आणावे लागते. वीज, जागा आणि  औद्योगिक सवलतीसाठी गुजरात राज्य चांगली सवलत देते. येथे उद्योगांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. गुजरातहून नागोठाणे येथे  इथेन नैसर्गिक वायू तलासरी, डहाणू मार्गे पाइपलाइनने वाहून नेण्यात आला आहे. हा वायू उद्योगांना पुरवल्यास विजेवरचा ताण कमी होऊन डबघाईला आलेल्या उद्योगांना नवी उभारी मिळेल. पाणी, वीज, वाहतूक परवडत नसल्याने डहाणूत फेव्हिकॉल, साडी प्रिंटिंग यासारखे कारखाने गुजरातला स्थलांतरित झाले आहेत. रबर उद्योगाला डहाणूत रेड बेल्टमधून काढण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आश्वासनही देण्यात आले परंतु कार्यवाही झाली नाही. रोजगार बुडाल्याने बेकार तरुणांनाही गुजरात उंबरगाव, बोईसर येथे अल्पमजुरीत रोजगार शोधावा लागत आहे.  तग धरून असलेल्या  येथील अनेक उद्योगांना नवीन उभारी देण्यासाठी नैसर्गिक वायू हा त्याला उत्तम पर्याय ठरू शकेल असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

फुगा व्यवसाय शेजारच्या गुजरात राज्यात ग्रीन बेल्टमध्ये आहे. तर हाच फुगा व्यवसाय महाराष्ट्र राज्यात रेड बेल्टमध्ये आहे. एकाच उद्योगांच्या बाबतीत हा प्रचंड विरोधाभास पाहायला मिळतो.

– संजय खन्ना, अध्यक्ष डहाणू रबर प्रोडक्ट असोसिएशन