सोमवार व मंगळवारच्या रात्री असणारा ‘शब्ब-ए-बारात’ हा मुस्लीम धर्मीयांचा सण शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेत आहे. या सणाच्या निमित्ताने ‘खैरात’ प्राप्तीसाठी दरवर्षी भिकाऱ्यांची उसळणारी गर्दी लक्षात घेता यंदा बाहेरगावच्या भिकाऱ्यांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय, बंदोबस्तावर तैनात पोलिसांचा ताण हलका व्हावा, या दृष्टीने पोलीस प्रशासनाने या वेळी साडेसहाशे खासगी स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.
आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून शब्ब-ए-बारातच्या रात्री मुस्लीम बांधव विविध कब्रस्थानांमध्ये जाऊन दुवापठण करीत असतात. २००६ मध्ये या दिवशी येथील बडा कब्रस्थानात तसेच तेथून जवळच असलेल्या मुशावरात चौकात साखळी बाँबस्फोटांची घटना घडली होती. त्यात ३५ जण ठार व तीनशेपेक्षा अधिक जण जखमी झाले होते. तेव्हापासून शब्ब- ए- बारातच्या दिवशी पोलीस यंत्रणेमार्फत दरवर्षी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शहरातील बडा कब्रस्तान व आयेशानगर कब्रस्तानात दुवापठण करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही अधिक असते. या वेळी बडा कब्रस्तानात साधारणत: दीड लाख लोक येतील, असा अंदाज असून या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी व या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार बडा कब्रस्तान परिसरात चौदा ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा व आठ ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच आयेशानगर कब्रस्थानात आठ ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा व एका ठिकाणी टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या लहरी रोखणारी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी सोबत नेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, नमाज पठणासाठी जाताना कब्रस्थानात पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, फुलांची डालकी, लोखंडी वस्तू, किल्ल्यांचा जुडा, शिरस्त्राण यासारख्या वस्तू नेण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत. कब्रस्थानापासून ठरावीक अंतरापर्यंत फुलांची तसेच अन्य कोणतेही दुकाने थाटण्यास तसेच भिकाऱ्यांना मज्जाव करण्यात आला असून कब्रस्थानांच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. घातपातविरोधी पथकाकडून कब्रस्तान व गर्दीच्या ठिकाणी काटेकोरपणे तपासणी करण्यात येत असून गोपनीय यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
शब्ब-ए-बारातच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने शहराच्या सीमेलगत विविध आठ ठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. या दिवशी बाहेरगावहून ‘खैरात’ मिळविण्यासाठी भिकारी मोठय़ा संख्येने शहरात येत असतात. अशा वेळी भिकाऱ्यांच्या वेशात गुन्हेगारी कारवाया करणारे लोक शहरात दाखल होऊ शकतात, अशी शक्यता तसेच त्यांच्या जवळील वस्तूंची नीट तपासणी होण्याविषयीची साशंकता लक्षात घेता या वेळी नाका तपासणीच्या दरम्यान ‘भिकाऱ्यांनो परत जा’ ही मोहीम पोलिसांनी अवलंबली आहे. सणाच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी शांतता समितीची बैठक घेऊन हा सण शांततेत पार पाडण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.