नाशिकपाठोपाठ पुण्यातही रावण दहनावरुन वाद निर्माण झाला आहे. भीम आर्मीच्या पुणे शाखेने पुणे पोलीस आयुक्तालयाला निवेदन दिले आहे. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे पोलिसांनी रावण दहनाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘भीम आर्मी’ने केली आहे.

नाशिकमध्ये रावण दहनास आदिवासी बचाव अभियान व कोकणा कोकणी आदिवासी सेवा संघाने विरोध दर्शवला आहे. यापाठोपाठ आता पुण्यातही रावण दहनासविरोध सुरु झाला आहे. आदिवासी तसेच मागासवर्गीय समाजातील अनेकांसाठी रावण दैवत आहे. रावण दहनाच्या कार्यक्रमांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा कार्यक्रमांना परवानगीच देऊ नये, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. राज्याच्या अन्य भागांमध्येही वेगवेगळ्या संघटनांनी या संदर्भातील पत्र दिल्याने रावण दहनावरुन महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सोमवारी भीम आर्मीने पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की, रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. जर पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी दिली तर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी पोलीस जबाबदार असतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनांचे म्हणणे काय आहे ?
विविध आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये रावणाची मंदिरे देखील आहेत. रावण हा महान राजा होता. मात्र, इतिहासात रावणाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. रावण हा खलनायक होता, हा दावाच चुकीचा आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे.