करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळांमध्ये बाहेरील वारकरी आणि नागरिक वास्तव्यास असता कामा नये. जर विनापरवाना कुठलेही नागरिक पंढरपुरात वास्तव्य करीत असतील तर संबंधित मठ चालक आणि धर्मशाळा यांनी तात्काळ प्रशासनास तशी माहिती कळवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर योग्यवेळी आवश्यकतेनुसार निर्देश देण्यात येतील. मात्र, तत्पूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची काळजी घेण्याच्या दृष्टीने येथील मठांमध्ये अथवा धर्मशाळांमध्ये विनापरवाना बाहेरील कुठलाही नागरिक येत असेल तर संबंधित नागरिकाची माहिती प्रशासनास मठ चालकांनी कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. याची दक्षता प्रशासनाला घेता येईल, असे ढोले यांनी सांगितले.

आणखी वाचा- एकादशीनिमित्त पंढरीत विनापरवानगी दर्शनास आलेल्या भाविकांवर कारवाई

पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपुरातील सर्व मठ आणि धर्मशाळा यांना नोटीसा बजावल्या आहेत. या आदेशान्वये राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिक, साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मठ व्यवस्थापक आणि धर्मशाळा व्यवस्थापक यांनी वास्तव्यास ठेवू नये. तसेच मठांच्या व धर्मशाळेच्या संख्येची व नागरिकांची नोंदणी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी स्वत: जवळ ठेवावी. तसेच विनापरवानगी कोणताही नागरीक आढळून आल्यास त्यांचावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले आहे.