18 November 2017

News Flash

राज्यात गुढी पाडव्यानंतर प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी: रामदास कदम

कापडी पिशव्या घेण्याचा सरकारचा प्रस्ताव

मुंबई | Updated: September 12, 2017 9:24 PM

रामदास कदम (संग्रहित छायाचित्र)

प्लास्टिकच्या पिशव्यांबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुढी पाडव्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालणार अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

शहरांमध्ये हजारो टन जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे समोर आले आहे. देश प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदीचे संकेत दिले आहेत. मंगळवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम, प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर रामदास कदम यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी टाकण्याविषयी माहिती दिली. गु़ढी पाडव्यानंतर राज्यभरात प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी टाकली जाईल असे त्यांनी सांगितले. प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या स्वरुपाच्या पर्यावरणपूरक पिशव्या वापरता येतील यासंदर्भात संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याचे समजते. तसेच महिला बचत गटांना अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिला बचत गटांना यासाठी अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत निर्देश दिले जातील.

First Published on September 12, 2017 9:24 pm

Web Title: ban on plastic carry bags after gudi padwa says environment minister ramdas kadam