|| जितेंद्र पाटील

दुष्काळाने होरपळलेल्या उत्पादकांना दिलासा

रमजान महिन्यास मंगळवारपासून सुरुवात होत असून फळांमध्ये स्वस्त, पौष्टिक मानल्या जाणाऱ्या केळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे केळीला १२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याने दुष्काळात होरपळलेल्या उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. केळीच्या भावात साधारणत: महिनाभर तेजी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढते. यंदाही रमजानच्या पाश्र्वभूमीवर, मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्यांची विविध फळांच्या उपलब्धतेसाठी धावपळ वाढली आहे. दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन आणि आवक घटल्याने बहुतांश फळांचे भाव यंदा तेजीत आहेत. सामान्य ग्राहक रमजानमध्ये स्वस्तातील केळीला जास्त पसंती देण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी केळी खरेदीवर भर दिला आहे. जिह्यत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनी खरेदीत अचानक वाढ केल्याने केळीचे भाव वधारले. एरवी, उन्हाळ्यात केळीला फारशी मागणी नसते. तिचे भाव क्विंटलला ८०० ते एक हजार रुपयांमध्ये सीमित असतात. यंदा मात्र वेगळे चित्र आहे. सद्य:स्थितीत रावेर तालुक्यात केळीला सर्वाधिक ११०० ते १२५७ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. जळगाव येथे ११०० ते १२१० रुपये क्विंटलचा भाव आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या केळीला ८०० ते १५६५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत आहे. दर्जेदार केळीसाठी व्यापारी अधिकचा भाव देण्यासही तयार आहे. रमजानमुळे आखाती देशांतूनही मागणी वाढते. यामुळे रावेर, यावल भागांतून निर्यात होणारी केळी भाव खात आहे. चोपडा येथील वामनराव पाटील फळ विक्रेता सोसायटीचे सचिव मुकेश पाटील यांनी दुष्काळामुळे केळीचे उत्पादन घटले असताना रमजान पर्वामुळे मागणी वाढून भाव उंचावल्याचे सांगितले.

उत्पादकांमध्ये समाधान

यंदा पाणीटंचाई आणि अति तापमान यामुळे उन्हाळ्यात केळीच्या बागा जगविणे मुश्कील होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तेजीचा फायदा उचलून केळीबागा लवकर खाली करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण रमजान महिन्यात केळीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

केळीचे भाव (प्रति क्विंटल)

  • रावेर – ११०० ते १२५७ रुपये
  • चोपडा – ११०० ते १२०० रुपये
  • जळगाव – ११०० ते १२१० रुपये
  • बऱ्हाणपूर – ८०० ते १५६५ रुपये