विषाणूजन्य रोगामुळे टोमॅटोचे पीकच धोक्यात आले असताना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून उपाययोजना करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनीच स्वत: पुढाकार घेतला असून टोमॅटो तपासणीसाठी बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर या संस्थेकडे पाठविले आहेत.

राज्यातील दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोचे पीक हे विषाणूजन्य रोगामुळे अडचणीत आले आहे. नगर, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी भागात टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. टोमॅटोच्या झाडावर रोग दिसत नाही. मात्र फळ वाकडे तिकडे होते. त्याचा रंग बदलतो. नंतर ते फळ सडते. अशाप्रकारचा रोग पहिल्यांदाच आला आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या रोगग्रस्त टोमॅटोच्या पिकाची पाहणी केली. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे अर्ज घेतले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पाहणी होऊनही तपासणीसाठी टोमॅटो बंगळुरु येथील संस्थेकडे पाठविण्यात आले नव्हते. कुरियर सेवा सुरु नसल्याचे कारण देऊन तसेच परप्रांतात जाण्यास बंदी असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

टोमॅटोवर आलेल्या या गंभीर प्रश्नाकडे कृषिमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घातले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. शेतकऱ्यांनाही कृषी विभाग व विद्यापीठ लक्ष घालेल, असे आश्वासन दिले. मात्र  विद्यापीठाने चालढकल केली. अखेर पाडेगाव (जि. सातारा) येथील प्रगतशील शेतकरी अजित कोरडे यांनी रोगग्रस्त टोमॅटोचे नमुने बंगळुरु येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. कोरडे हे स्वत: कृषी पदवीधर असून टोमॅटो उत्पादक आहेत.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोटय़वधी रुपये खर्च करून सूक्ष्मदर्शक खरेदी केला आहे. मात्र त्याचा वापरच गेल्या अनेक वर्षांत झालेला नाही. तसेच विषाणूजन्य रोगाचे तज्ज्ञ असलेल्या शास्त्रज्ञाचीही कमतरता आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हजारो हेक्टर क्षेत्रात भाजीपला आहे. असे असूनही विद्यापीठाने फारसे हे गांभीर्याने घेतलेले नाही. त्याबद्दलही कृषी क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

करोनामुळे बंगळुरुला कृषी विद्यापीठाचे वाहन पाठविताना अडचणी येत आहेत. त्या संदर्भात कृषी विभागाशी बोलणे सुरु आहे. कुरियर सेवाही बंद आहे. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर या संस्थेतील तज्ज्ञांशी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चर्चा केली आहे. त्यानुसार उपाययोजना कृषी विभागाला सुचविली आहे.

—डॉ. के. पी.  विश्वनाथा, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी