कर्जत तालुक्यातील नेरळ येथे राहणाऱ्या २२ वर्षीय बांगलादेशी घुसखोराला रायगडच्या बांग्लादेशी घुसखोरविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. मोहम्मद अब्दुल रशीद शहाजाद खान असे या बांग्लादेशी घुसखोराचे नाव असून तो मूळचा खुलाना जिल्ह्य़ातील दिघोलियाचा रहिवाशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नेरळ येथील आनंदवाडी रोडवर हा तरुण संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती, रायगड पोलिसांच्या बांगलादेशी घुसखोरविरोधी पथकाला मिळाली होती. यानंतर या पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक प्रल्हाद माने यांच्या पथकाने या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि, भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र पथकाने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची हा तरुण समर्पक उत्तरे दिऊ शकला नाही. अंगझडतीदरम्यान तरुणाकडे बांग्लादेशचे निवडणूक ओळखपत्र आढळून आले. बांगलादेशाची सीमा ओलांडून बेकायदेशीररीत्या तो पश्चिम बंगालमाग्रे महाराष्ट्रात दाखल झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक कायदा १९४८ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बांगलादेशी घुसखोरविरोधी पथकाचे प्रमुख प्रल्हाद माने पुढील तपास करत आहेत.
दरम्यान या घुसखोराला न्यायालयासमोर हजर केले असून त्याने बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे बांगलादेशी घुसखोरविरोधी पथकाच्या स्थापनेनंतर रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत १५ घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.