पोलिसांनी खुलासा मागवला; रजिस्टर फाटल्याचे सांगत ग्रामपंचायतीची सारवासारव

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करून विरारमधून पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे चक्क अर्नाळा ग्रामपंचायतीने दिलेले दाखले आढळून आलेले आहे. पोलिसांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी याप्रकरणी ग्रामपंचायतीकडून खुलासा मागवला आहे. ग्रामपंचायतीने मात्र दाखल्यांचे रजिस्टर फाटल्याचे कारण देत सारवासारव केली आहे.

वसई-विरार परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई सुरू केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करून राजोडी, कळंब, अर्नाळा या ठिकाणी छापे घालून एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांचे मूळ गाव बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींविरोधात विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम १९२० म चे कलम ३(अ), ६ (अ)सह विदेशी अधिनयिमन १९४६ चे कलम १४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे बांगलादेशी अनेक वर्षांंपासून या परिसरात वास्तव्य करत होते. पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केलेली आहे. त्या तपासणीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे चक्क अर्नाळा ग्रामपंचायतीने दिलेले जन्मदाखले आढळून आले आहे. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांना दोन बांगलादेशी नागरिकांचे वसईतील जन्म दाखले आढळले आहे. याप्रकरम्णी अर्नाळा सागरी पोलिसांनी अर्नाळा ग्रामपंतायतीला नोटीस पाठवली आहे. कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे जन्मदाखले दिले, याचा खुलासा पोलिसांनी नोटीसद्वारे विचारला आहे. विशेष म्हणजे या अटक केलेल्या तीन नागरिकांविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. आम्ही याप्रकरणी अर्नाळा ग्रामपंचायतीकडून खुलासा मागवलेला आहे. तो मिळताच त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

अर्नाळा ग्रामंपचायतीने मात्र कानावर हात ठेवले आहे. आम्हाला पोलिसांनी पत्र पाठवून खुलासा मागवला आहे, असे अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज संख्ये यांनी सांगितले. आमच्याकडे असलेले जन्म मृत्यूचे दफ्तर (रजिस्टर) फाटले असून त्याचे तुकडे तुकडे झालेले आहे. त्यामुळे नेमके कुणाला आणि कधी दाखले दिले, त्याचा तपशील उपलब्ध झालेला नाही, असे संख्ये म्हणाले.

अर्नाळा ग्रामपंचायतीकडून अशाप्रकारे दाखले दिले जात असल्याने मात्र खळबळ उडाली आहे. वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. ही गंभीर बाब आहे. अशाप्रकारे बांगलादेशी नागरिकांना दाखले दिले जात असतील तर देशाच्या सुरक्षेला धोका आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

देशात घुसखोरी करून बेकायदा राहाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आपल्या देशातील जन्मदाखले मिळणे ही गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

– जयप्रकाश ठाकूर, माजी उपसभापती, वसई पंचायत समिती

ते आरोपी बांगलादेशीच

पोलिसांनी अटक केलेले २३ जण बांगलादेशी असल्याचे अर्नाळा सागरी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते बांगलादेश असल्याची माहिती मिळाली होती. मात्र थेट कारवाई न करता आम्ही त्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांचे तपशील (सीडीआर) तपासले. हे नागरिक बांगलादेशमध्ये फोन करत होते. तसेच त्यांना बांग्लादेशमधून फोन येत होते. त्यामुळे या सर्व आरोपींचे बांगलादेशाशी असलेले संबध उघड झाले आहेत. त्यांचे नातेवाईक आणि मूळ घर बांगलादेशात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आणि मग आम्ही कारवाई केली, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे भारतीय असल्याचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. मात्र दोन ते तीन जणांकडे जन्म दाखले सापडले.

यातील एक बांगलादेशी जोडपे अनेक वर्षे येथे स्थयिक आहे. त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. मात्र त्यांच्या मुलांकडे आहेत, असेही पोलीस म्हणाले.

अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे स्थानिक ग्रामपंतायतीने दिलेले जन्मदाखले आढळलेले आहेत. ते कुठल्या आधारावर दिले याची विचारणा आम्ही अर्नाळा ग्रामपंयातीकडे केलेली आहे. त्यांचा अहवाल आल्यावनंतर पुढची कारवाई करण्याबाबत ठरविण्यात येईल.

– विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

पोलिसांनी केवळ पत्र दिलेले आहे. दाखले दिलेले नाहीत. आमच्याकडील रजिस्टर आता फाटलेले आहे. त्यामुळे कुणी दिले, कधी दिले ते सांगता येणार नाही

– पंकज संख्ये, ग्रामसेवक, अर्नाळा ग्रामपंचायत