26 November 2020

News Flash

बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे निधन

बंजारा समाजाची काशी म्हणून मानोरा तालुक्यातील पोहरादेवीची ओळख आहे.

अकोला : संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांचे मुंबई येथे  निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. पोहरादेवी येथे रविवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे लिलावती रुग्णालयातही उपचार करण्यात आले. बंजारा समाजाची काशी म्हणून मानोरा तालुक्यातील पोहरादेवीची ओळख आहे.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांची समाधी व माता जगदंबा शक्तीपीठ येथे आहे. पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर डॉ. रामराव महाराज हे १९४८ पासून विराजमान होते.

रामराव बापू महाराज यांची समाजसेवा आणि समृद्ध आध्यात्मिक ज्ञान स्मरणात राहील. गरिबी आणि मानवी समस्या दूर करण्यासाठी ते अविरत कार्यरत राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले. या दु:खदप्रसंगी माझ्या सहवेदना त्यांच्या भक्तांसोबत आहेत.

 –  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर एकूणच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संत रामराव महाराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षण प्रसार यासाठी ते सतत आग्रही होते. देशभरातील बंजारा समाजाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

डॉ. रामरावबापू महाराज हे संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे निधन ही देशाच्या सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, मानवतावादी चळवळीची मोठी हानी आहे.

–  अजित पवार, उपमुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 1:32 am

Web Title: banjara community religious leader ramrao maharaj passes away zws 70
Next Stories
1 ऊसदराचा निर्णय आता राज्यांकडे
2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी
3 खासदारांना खंडणीच्या धमकीनंतर पोलिसांकडून तपासाला गती
Just Now!
X