ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने अव्यवहार प्रकरणी लावलेल्या निर्बंधानंतर पालघरमध्ये विविध बँकांच्या बँक खातेधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच् समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या शासकीय बँका बंद होत असल्याच्या संदेशामुळे त्यात आणखी भर पडली असून  या संदेशामुळे  ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

शासकीय बँका बंद होण्याच्या या संदेशावर त्या बँकेचे खातेदार त्या-त्या बँकांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारत आहेत. खातेदारांची मनधरणी करण्यासाठी बँक कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत तर काही बँकांचा नावाचा समावेश असलेल्या बँकांमधून तेथील खातेदारांनी आपल्या ठेवी व खाती कायमची बंद केली असल्याचे एका बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे शासकीय बँकांचे नुकसान होत आहे.  माध्यमांवर पसरत असलेल्या या संदेशात रिझर्व बँकेच्या आदेशाने १४ बँक पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिल्याचे म्हटले असून यामध्ये कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जी पी पारसिक बँक, कॅनरा बँक, ठाणे जिल्हा सहकारी बँक आदी बँकांचा समावेश आहे.  या बँकांमध्ये आपली खाती असतील तर त्वरित पैसे काढून घ्या असे नमूद करण्यात आले असून हा संदेश अनेक समाज माध्यमांवर झळकत आहे.

काही सरकारी बँका बंद होणार असल्याचे फिरत असलेले संदेश या अफवा आहेत. याउलट सरकारी बँका अधिक भक्कम करून अधिक गतिमान करण्यात येणार असून खातेदारांना अधिक चांगली सेवा याद्वारे देऊ  केली जाणार असल्याची  माहिती केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी अशा चुकीच्या संदेशांवर व अफवांवर विश्वास ठेवू नये. – कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश खोटे व अफवा पसरवणारे आहेत.खातेदारांची खाती शासकीय बँकेत सुरक्षित आहेत व पुढेही राहणार आहेत.चुकीचा संदेश पसरत असलेल्यामध्ये नमूद बँकेपैकी कोणतीही बँक बंद होणार नाही याची पुष्टी रिझव्‍‌र्ह बँकेनेही केली आहे.

– अभय पाटील , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक