अ‍ॅक्सिस बँकेतील ग्राहकाचे खाते हॅक करून दोन कोटी रुपये परस्पर लांबविणाऱ्या आंतरराज्य टोळीचे जाळे धुळे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. एका नायजेरियन व्यक्तीसह दिल्लीतील पाच संशयितांना अटक करण्यात आली असून नायजेरियन व्यक्ती टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. या टोळीकडून विविध बँकांच्या एटीएम कार्डसह सहा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीची व्याप्ती मोठी असून आणखी काही बँक हॅकिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शहरातील अ‍ॅक्सिस बँकेतील धुळे विकास बँकेच्या चालू खात्यातून नऊ जून रोजी हॅकर्सने दोन कोटी, सहा लाख ५० हजार १६५ रुपये लांबविले होते. यानंतर शाखाधिकारी धनेश सगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या गन्ह्य़ाची उकल करण्यात यश मिळविले. हॅकर्सने १८ बँकांच्या २७ खात्यांमध्ये रक्कम वर्ग केली होती. नंतर सदरच्या २७ खात्यांतून ६९ खात्यांत आणि तेथून २१ खात्यांत, अशा प्रकारे देशभरातील सुमारे ११७ विविध बँक खात्यांत ही रक्कम वर्ग केली होती. तक्रार येताच पोलिसांनी वेळीच ही सर्व खाती गोठवून ८८ लाख, ८१ हजार, १७३ रुपये लंपास होण्यापासून थांबविले. तपासात पोलिसांना एका संशयिताचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. त्याआधारे नीतिका चित्रा (३०, रा. जुने महावीर नगर, नवी दिल्ली) हिला ताब्यात घेतले. तिने दिलेल्या माहितीवरून संपूर्ण टोळीच्या कारवाया उघड झाल्या. नीतिकाचा पती दीपक चित्रा (२९, रा. नवी दिल्ली) हा टोबॅचिकू जोसेफ ओकोरो ऊर्फ प्रेस (२३, ग्रेटर नोएडा) नावाच्या नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात होता. प्रेस हा देशभरातील कुठल्याही बँकेचे खाते हॅक करून त्यातील रक्कम विविध बँक खात्यात वर्ग करायचा. दीपक, नीतिका, रमणकुमार दर्शनकुमार (३०), अवतारसिंग ऊर्फ हॅप्पी वरेआमसिंग (२८, रा. तिलकनगर, नवी दिल्ली) यांच्या मदतीने सर्वसामान्य लोकांकडून ‘केवायसी’ कागदपत्र घेऊन विविध बँकांमध्ये बनावट खाते उघडायचे. आणि त्या खात्यातून पैसे काढायचे. अशा प्रकारे ही टोळी काम करत असल्याचे तपासात उघड झाले.

नायजेरियन प्रेस या व्यक्तीचा व्हिसा संपलेला असतानाही तो अजून भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले आहे. या व्यक्तीविरुद्ध व्हिसा नियमांच्या उल्लंघन प्रकरणीही वेगळा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले.