पेण तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बँक दरोडय़ाचे प्रकरण ताजे असतानाच, रोहा तालुक्यातील धाटाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून २५ लाख ६ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
सलग चार दिवस आलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन धाटाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र बँकेत हा दरोडा टाकण्यात आला आहे. सामाईक सुविधा केंद्रात असलेल्या या बँकेत चोरटय़ांनी डुप्लिकेट चावीच्या साहय़ाने चोरटय़ांनी प्रवेश केला. त्यानंतर बँकेची तिजोरी असणाऱ्या खोलीत फॉल सीलिंग तोडून प्रवेश मिळवला. तिजोरीच्या डुप्लिकेट चावीचा वापर करून आतली २५ लाख ६ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
सोमवारी सकाळी बँकेत चोरी झाली असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर सौरभ कन्हेरी यांनी याबाबत रोहा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भा.दं.वि. कलम ४५४, ४५७ आणि ३८० नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे आणि पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, कारण बँकांना लुटण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पेण तालुक्यातील वरसई येथील बँक ऑफ महाराष्ट्रची २५ लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली होती. २९ डिसेंबर २०१५ ला पेण ते वरसईदरम्यान ही घटना घडली होती. बँकेचे अधिकारी गोपाळ गुप्ता, शिपाई संदीप खोत हे २५ लाख रुपयांची रक्कम मिनीडोअरमधून वरसई शाखेकडे निघाले होते. मिनीडोअर वरसई फाटय़ाजवळ आली असताना दोन मोटरसायकलवरील बुरखा घालून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी पुढे बसलेल्या बँक अधिकारी गुप्ता यांच्यावर पिस्तूल रोखून तसेच चॉपरचा धाक दाखवून मागे बसलेल्या शिपायाकडील कॅशबॅग हिसकावून घेऊन क्षणार्धात पोबारा केला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली होती. अलिबाग शहरातील दोन पतसंस्था एकाच दिवशी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जिल्हय़ात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे खळबळ उडाली असून लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.