शेतकऱ्याच्या पत्नीकडे पीक कर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱा बुलडाण्यातील फरार बँक अधिकारी राजेश हिवसेला नागपूरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मलकापूर तालुक्यातील सेंट्रल बँकेच्या दाताळा शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला होता. मंगळवारी हिवसेला मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दाताळा येथील शेतकरी त्यांच्या पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरुवारी सकाळी गावातील सेंट्रल बँकेत गेले होते. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंतर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने त्यांना केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. इतकंच नाही तर, या मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही दिलं जाईल, असा निरोप त्यांनी शिपाई मनोज चव्हाण याच्यामार्फत महिलेला पाठविला होता.

संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेतकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता, आणि राजेश हिवसे याला निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तीन दिवसानंतर हिवसेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी सेंट्रल बँकेला काळंही फासलं होतं. दरम्यान, हिवसे आणि चव्हाण हे दोघेही फरार झाले होते. त्यांपैकी चव्हाण याला पोलिसांनी यापूर्वीच अमरावती येथून अटक केली असून हिवसेला सोमवारी नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली होती आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि संबधित शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank officer arrested who demand sex from farmers wife for crop loan
First published on: 25-06-2018 at 22:02 IST