06 July 2020

News Flash

मराठवाडय़ातील १८ कारखान्यांकडे ऊस खरेदीकराचे ११४ कोटी बाकी

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्य़ांतील १८ साखर कारखान्यांनी ऊस खरेदीकराचे १११ कोटी ८४ लाख रुपये थकविले आहेत. विक्रीकर विभागाकडे हा कर भरावा, असे

| March 10, 2015 01:10 am

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्य़ांतील १८ साखर कारखान्यांनी ऊस खरेदीकराचे १११ कोटी ८४ लाख रुपये थकविले आहेत. विक्रीकर विभागाकडे हा कर भरावा, असे अपेक्षित होते. काही कारखान्यांनी तब्बल ७ वर्षांपासून हा कर भरला नसल्याने ५ कारखान्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. उर्वरित कारखान्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात आला असून, ही रक्कम तातडीने वसूल व्हावी यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दुष्काळाचे कारण पुढे करूनही मोठय़ा प्रमाणात गाळप करणाऱ्या काही कारखान्यांनी ऊस खरेदीकर भरला नाही. गेल्या वर्षी दुष्काळी स्थिती असल्यामुळे या करातून एक वर्षांसाठी सरकारने सवलत दिली होती. तथापि, मागील काही वर्षांत कर न भरण्याच्या वृत्तीमुळे दिवसेंदिवस थकलेली रक्कम वाढत जात असल्याचे दिसून आले आहे.
पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना वैद्यनाथ साखर कारखान्याकडून चालविला जात होता तेव्हा कर भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. आता हा कारखाना खासगी उद्योजक सचिन घायाळ यांनी करार न करता ताब्यात घेतला आहे. या कारखान्याची तब्बल ७ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी २००७ पासून असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘वैद्यनाथ’ने ज्या काळात हा कारखाना चालविला, त्या काळातील म्हणजे २०११-१२ मधील १ कोटी १५ लाख रुपये थकले आहेत. छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखान्याचे ८९ लाख, मुक्तेश्वर शुगर मिलचे ८८ लाख रुपये, गंगामाई साखर कारखान्याकडे ९ कोटी २१ लाख, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ६ कोटी ६५ लाख, देवगिरी साखर कारखान्याकडे १० कोटी ४५ लाख रुपये थकले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने या साखर कारखान्यांची संपत्ती जप्त केली. विनायक सहकारी साखर कारखान्याकडे ४ कोटी ५१ लाख, गंगापूर सहकारी साखर कारखान्याकडे ६ कोटी ८९ लाख रुपये थकीत आहेत. गंगापूर साखर कारखान्याच्या सात-बारावर बोजा चढविण्यात आला. कन्नड साखर कारखान्याकडेही ७ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. जय भवानी, माजलगाव सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गजानन सहकारी साखर कारखाना, पद्मश्री डॉ. व्ही. व्ही. पाटील सहकारी साखर कारखाना-केज, जालना सहकारी साखर कारखाना यांच्याकडेही १ कोटी ४२ लाखांपासून ते १३ कोटी ८८ लाख रुपयांपर्यंत कर थकीत आहे. यात अंबाजोगाई कारखान्याकडे सर्वाधिक १५ कोटी ९ लाख रुपये थकले आहेत. त्यांची संपत्ती व बँक खाते बंद करण्याची कारवाई करण्यात आली. कारवायांना फारशी भीक न घालणाऱ्या कारखान्यांकडे अजूनही तब्बल १११ कोटी थकबाकी आहे.
दुष्काळ, गारपीट यामुळे उसाचे नुकसान झाले. पाऊस कमी पडल्याने पुरेसा ऊस उपलब्ध नाही. साखरेचे दरही कमीच आहे. परिणामी कर भरणे शक्य नसल्याची अडचण साखर कारखानदार सांगतात. मात्र, दिवसेंदिवस मागील थकबाकीही ‘बुडीत’ राहावी, असेच प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत. या अनुषंगाने विक्रीकर सहआयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले की, मार्चअखेरीस वेगवेगळ्या संस्थांवर थकबाकी वसुलीसाठी आम्ही कारवाया करतो. त्याचाच भाग म्हणून काही कारवाया केल्या आहेत. मात्र, ही थकबाकी मोठी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2015 1:10 am

Web Title: bank transaction close of five sugar factory
Next Stories
1 ‘हल्लेखोर, सूत्रधारांना शिक्षा मिळेपर्यंत डाव्यांचा लढा’
2 सावेडीत ‘हॅपी वुमेन्स स्ट्रीट’वर आनंद लुटला
3 ‘ऑनलाइन’ शिष्यवृत्तीमुळे गैरप्रकारांना आळा
Just Now!
X