X

बंदीनंतरही थायी मागूर माशांची विक्री

थायी मागूरशिवाय तिलापिया किंवा तिलापी माशांवरही बंदी आहे.

सांगली-साताऱ्यात गुन्हे दाखल

औरंगाबाद : स्थलांतरित माशातील एक प्रकार असलेल्या ‘थायी मागूर (क्लारीअस बॅट्राशस)’ वर राज्य शासनाने बंदी घातलेली असतानाही त्याची विक्री राज्यातील विविध भागांमध्ये जोमात सुरू आहे. मागूर माशामुळे कॅन्सरवाढीसाठी पोषक असणारे विषाणू शरीरात पसरत असल्याचे समोर आले. त्यामुळे मागूरवर बंदी असून, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झालेली आहे.

अगदी अलिकडेच सांगली व सातारा भागात १५६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पुणे व परिसरातील ५०० ते ६०० जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. मत्स्य विभागाच्या मते माशांमधील कटला, रोहू, मिरगला हे शाकाहारी मासे. तर सायप्रिनस हा मिश्रआहारी. थायी मागूर मासा मात्र पूर्णत मांसाहारी आहे. मागर, मागुरी व वाघूर अशा नावानेही तो ओळखला जातो. थायी मागूर मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो. अगदी चिखलातही. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मागूरची लांबी असते. मानेजवळ काटे असतात. त्याची विचित्र सवय आहे. तो काहीही खातो. त्यामुळे त्याचे मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्याच्यावर बंदी आणलेली आहे. तरीही त्याची विक्री अनेक ठिकाणी जोरात सुरू आहे.

थायी मागूरशिवाय तिलापिया किंवा तिलापी माशांवरही बंदी आहे. मात्र त्यातील रेड तिलापीयावर बंदी नाही. सोलापुरातील उजनी प्रकल्पातून रेड तिलापी माशांचे उत्पादन घेतले जाते. तिलापीयातील इतर माशांवर बंदीचे कारण त्यांची प्रजनन प्रक्रिया. एक मादी मासा एका वेळी ८० हजार अंडी देते. या माशांचे समागम हे तोंडाद्वारे (माउथ ब्रिडिंग) होते. माशातील नर हाच अंडय़ांवर बसतो, अशी माहिती मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

थायी मागूर माशावर राज्य शासनाने बंदी आणलेली आहे. औरंगाबादेत कुठे कोणी विक्री करताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. स्थानिक ठिकाणी कारवाईची नोंद नाही. मात्र अन्य ठिकाणी मागूर विक्री करताना आढळले, तर कारवाई केली जात आहे.

 – र. हि. सपकाळ, सहायक आयुक्त मत्स्य विभाग

First Published on: September 6, 2018 3:52 am