|| नीरज राऊत

नद्यांवर बंदी घातल्याने समुद्रकिनारी अवैध वाळूउपसा

नद्यांमध्ये रेतीउपसा करण्यास राज्य शासनाने बंदी घातल्याने रेतीमाफियांनी समुद्रकिनाऱ्यांना लक्ष्य केले आहे. समुद्रकिनारी जमा होणाऱ्या रेतीचा गैरमार्गाने उपसा करण्याचे काम रेती व्यावसायिकांकडून सुरू असून महसूल आणि पोलीस विभागांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. सातत्याने रेतीउपसा केल्याने समुद्रकिनारी असलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने नद्यांमध्ये रेतीउपसा करण्यावर र्निबध आणले असून अवैद्य पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात बांधकामासाठी रेडी मिक्स काँक्रीट व कृत्रिम रेतीचा वापर केला जात असला तरीदेखील भिंतींना प्लास्टर करण्याकरिता रेतीची आवश्यकता भासते. नद्या आणि खाडीमधील पाण्यासोबत वाहून येणाऱ्या गाळामध्ये रेतीचे प्रमाण लक्षणीय असते. हा रेतीयुक्त गाळ भरती-ओहोटीनंतर खाडीलगतच्या भागात समुद्रकिनारी साचत असल्याने त्याकडे रेती व्यावसायिकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. समुद्राच्या पाण्यामुळे या रेतीमधील माती धुतली जात असल्याने समुद्रकिनारी असलेल्या उच्च प्रतीच्या रेतीला सध्या बाजारामध्ये मागणी आहे.

पालघर जिल्ह्य़ातील शिरगाव, सातपाटी, नांदगाव, उनभाट, चिंचणी, बोर्डी व इतर किनाऱ्यांवर रेती व्यावसायिक टेम्पो व लहान ट्रक घेऊन ओहोटीच्या वेळी येत असून मनुष्यबळाच्या मदतीने किंवा जेसीबीच्या मदतीने पिकअप, टेम्पो अशा वाहनांमध्ये रेती भरली जाते. मात्र त्यामुळे रेती उत्खनन केलेल्या ठिकाणी खड्डा पडत असून पुढच्या भरतीच्या वेळी लगेच या भागातील रेतीमुळे या खड्डय़ाचे सपाटीकरण होत आहे.

सातपाटी धूपप्रतिबंधक किनाऱ्याला धोका

सातपाटी येथे उभारण्यात येणाऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या १५ ते २० फूट अंतरावर ओहोटीच्या वेळी गेल्या काही दिवसांपासून १० ते १५ टेम्पो उभे करून त्यामध्ये रेती भरली जाते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने नंतर या रेतीची वाहतूक केली जात आहे. या गैरप्रकाराला स्थानिकांनाचा विरोध असून स्थानिक रहिवाशांनी विरोध केला असता रेती व्यावसायिकाने त्यांना दमदाटी केल्याची माहिती पुढे आली आहे. या उत्खननामुळे बंधाऱ्याखालील वाळू सरकत असून यामुळे बंधारा कमकुवत होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. सातपाटी गावात काही ठिकाणी अशा रेतीचा साठा केल्याचे गावकरी सांगत असून याविरुद्ध महसूल विभाग कारवाई करत नसल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.