राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज, बुधवारी बंद पाळण्यात येणार आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत बारामती बंद हास्यपद असल्याची म्हटले आहे. शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंद करण्याचे आवाहन केलं. हे हास्यास्पद आहे. चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असा टोलाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लगावला आहे. बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? पण त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं. अशा शेलक्या शब्दात दमानिया यांनी टीका केली आहे.

अन्य दुसऱ्या एका ट्विटमध्ये दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, “खरंच आनंद होतोय.. एक राक्षस दुसऱ्या राक्षसाला मारताना बघून…दुसरा ठार होणार की नाही हे मात्र काळच सांगेल. नाहीतर निवडणूक झाली की सगळं थंड.”

दरम्यान, राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संध्याकाळी ही बातमी धडकताच पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे. आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने बुधवारी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीतील नागरिकांच्या वतीने हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शारदा प्रांगण बारामती या ठिकाणी जमावे असे आवाहनही करण्यात आले आहे.