पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कटफळ, काटेवाडी भागात मागील महिन्याभरापासून एका बिबट्याने दहशत पसरवली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन अधिकार्‍यांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील कटफळ, काटेवाडी या परिसरात असणार्‍या एम.आय.डी.सी. मधील चाॅकलेट कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहिल्यांदा बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर बिबटय़ाच्या शोध अनेक दिवसापासून वन अधिकाऱ्यांकडून घेतला जात होता. त्या दृष्टीने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे देखील लावण्यात आले होते. अखेर आज पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यामुळे, वन अधिकार्‍यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.