बारामतीत अजित पवार यांना येत्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे हा हे प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बारामतीमध्ये अजित पवार यांना पराभूत करण्यासाठी कोणती व्यूहरचना आखण्यात आली असा सवाल त्यांना करण्यात आला होता. मी जमिनीवर पाय असलेला राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला अजित पवार यांचा पराभव करू असे म्हटले तर माझ्यावर जोरात हसू लागाल. माझं टार्गेट 2024 ची लोकसभा निवडणूक असून त्यावेळी बारामतीमध्ये कमळावरचा खासदार निवडून आणावा हे माझे टार्गेट असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभेतील सहा विधानसभांना आम्ही विश्वास देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही केवळ निवडणुकांपुरते येत नाही, हेदेखील मतदारसंघात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पाटील नमूद केले. तसेच 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होईल आणि 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. महिनाभरात बरीच उलथापालथ होईल आणि महायुतीच्या २५० जागा निवडून येतील, असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागला. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे ती विधानसभा निवडणुकीची. ही निवडणूक कधी होणार? हे स्पष्ट व्हायचे होते कारण तशा तारखा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. आता मात्र चंद्रकांत पाटील यांनी १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल असं म्हटलं आहे.

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळेच यावेळीही १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यानच विधानसभा निवडणूक होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात फिर एक बार शिवशाही सरकार ही यात्राही काढण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाणार आहे. अब की बार २२० पार असा नवा नारा असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी याआधीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.