ज्या पद्धतीने अमेठीमध्ये आमचा विजय झाला, त्या पद्धतीने बारामतीदेखील जिंकू, असा विश्वास भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तर, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी देखील मराठा आरक्षणाबाबत आणि पावसासह विधानसभेला २२० जागा युतीला मिळाव्यात यासाठी विठोबाला साकडे घातले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पंढरपुरात भाजपा मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. या वेळी त्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख,आ. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, उत्तम जानकर, शहाजी पवार, शहराध्यक्ष संजय वाईकर, नगराध्यक्षा साधना भोसले आदि उपस्थित होते.मंदिर समितीच्या वतीने महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळीही अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.

पाटील म्हणाले,की प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते. मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. तरीदेखील सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकावे, यासाठी आपण विठोबास साकडे घातले आहे. त्याचबरोबरीने राज्यात पाऊस पडत असताना अचानक दुष्काळासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे याठिकाणी पाऊस देखील पडण्यासाठी आपण साकडे घातले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  विधानसभेसाठी भाजपा-शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदासाठी तसेच जागावाटपासाठी भांडणे होतील, असे अनेकांना वाटते.

त्यासाठी अनेकांनी देव देखील पाण्यात ठेवले आहेत. तरीदेखील भाजपा-शिवसेना एकत्र येऊन लोकसभेप्रमाणे विधानसभेत घवघवीत यश मिळवेल, असेही ते यानिमित्ताने म्हणाले.तसेच ज्या पद्धतीने अमेठीमध्ये मंत्री स्मृती इराणी यांनी जिंकून दाखवले, त्याच पद्धतीने बारामती आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही बारामती जिंकू ,असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कृत्रिम पावसाची तयारी पूर्ण -पाटील

पश्चिम महराष्ट्रातील दुष्काळी भाग म्हणून सोलापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यत कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. या कामी सोलापूर आणि अहमदनगर येथे रडार देखील उभारण्यात आले आहेत. मात्र आवश्यक असणारे ढग तयार होत नाहीत. मात्र कृत्रिम पावसाची आमची तयारी पूर्ण आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.