प्रदीप नणंदकर

खाद्यतेलाचा वापर गरजेपेक्षा दीडपटीपेक्षाही अधिक होत असल्याने देशात स्थूलत्व, हृदयरोग, मधुमेह अशा विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आत्मनिर्भरतेला खीळ बसवण्याची तरतूदच समाजातील लोक तेलाच्या अतिवापरामुळे करत असल्याचे चित्र आहे. हैदराबाद येथील तेलबिया संशोधनालयातील शास्त्रज्ञ डॉक्टर सुधाकर बाबू यांनी नुकतीच या विषयातील खंत लातूर येथील एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

१९८५ साली खाद्यतेलाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होता, त्या काळात खाद्यतेलाचा वापर हा दर माणशी दरमहा केवळ अर्धा किलो होता, लोक गरजेपुरतेच खाद्यतेल वापरत असत. त्यानंतर खाद्यतेलाच्या वापराचे प्रमाण हे वाढते आहे, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या संकेतानुसार दरमहा प्रति माणशी अधिकाधिक एक किलो खाद्यतेल वापरणे शरीराला हिताचे आहे त्यापेक्षा अधिक किंवा कमी वापर शरीराला त्रासदायक ठरू शकतो.

डाळीच्या बाबतीत २०१५ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले व डाळीचा बाबतीत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवत देश आता स्वयंपूर्ण झाला आहे. तेलबियाच्या बाबतीतही आपण स्वयंपूर्ण व्हावे असा प्रयत्न केला जातो आहे. शास्त्रज्ञ नवनवीन वाण शोधताहेत. ज्यातून उत्पादकता वाढते आहे, शेतकरीही या वाणाचा पेरा करत उत्पादन वाढवत आहेत. मात्र खरी गरज आहे ते अनावश्यक वापर कमी करणे याकडे लक्ष देण्याची. या बाबतीतली जनजागृती मोठय़ा प्रमाणावर केली गेली पाहिजे तरच आपण आत्मनिर्भर होऊ. अन्यथा उत्पादन कमी व वापर अधिक या पद्धतीने आपण अडचणीत येऊ. भारतात तेलबिया चे उत्पादन केवळ कोरडवाहू शेतीत घेतले जाते. ७५ टक्के प्रमाण हे कोरडवाहू शेतीचे आहे व केवळ २५ टक्के प्रमाण हे बागायती आहे. ज्या भागात तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. त्या भागात पाऊस चांगला पडला तर त्या पावसाचा वापर हा तेलबियांच्या सिंचनासाठी केला जात नाही. उलट उसाचे पीक वाढवण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. शेतकऱ्यांमध्ये या बाबतीतही जनजागृती केली पाहिजे व उसासाठी अतिरिक्त वापरले जाणारे पाणी तेलबियाकडे वापरले गेले पाहिजे असे मत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांनी व्यक्त केले. तेलबियांच्या बाबतीत विविध समस्या आहेत. मुळात शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनानुसार शेतमालाचा भाव मिळत नाही ही खंत आहे सोयाबीन, एरंडी, वाणांचा भाव हा काही प्रमाणात अधिक आहे, मात्र ज्या वाणांचे उत्पादन मूलत: कमी होते ते वाण शेतकरी घेत नाही.मुळात आपल्याकडे कारळ, तीळ, जवस हे तेलबिया यातील अतिशय दर्जेदार पीक घेतले जात होते. त्यांची उत्पादन क्षमता ही अर्धा टनपेक्षाही कमी आहे. त्यातील आनुवंशिक गुणधर्म आहेत, पण तरीदेखील या तेलाची गुणवत्ता लक्षात घेऊन या बियाचा पेरा वाढला गेला पाहिजे. जवस अतिशय उपयोगी असे हे पीक आहे. हे पीक पुन्हा एकदा घेतले गेले पाहिजे याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. शेतकरी अशा तेलबिया पिकवतील यासाठी  त्या प्रमाणात भाव दिला गेला पाहिजे. सध्या मिळत असलेल्या भावाच्या किमान तिप्पट पैसे हे त्याला मिळायला हवेत. शेतकऱ्यांनीही मूल्यवर्धनाकडे वळले पाहिजे. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विविध प्रयोग केले गेले पाहिजेत. याची आवश्यकता ही सुधाकर बाबू यांनी व्यक्त केली. पंचवीस वर्षांपूर्वी २५ लाख हेक्टरवर सूर्यफुलाचा पेरा भारतामध्ये होता. आज केवळ अडीच लाख हेक्टर एवढय़ा क्षेत्रावर शिल्लक आहे. कारळ, तीळ, जवस या बियांचे क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत आपण खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेचे स्वप्न बघत आहोत. या स्वप्नपूर्तीसाठी केवळ एकाने विचार करून चालणार नाही. त्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, लोकांची समज वाढली पाहिजे.

अहवालात काय?

* नुकत्याच आलेल्या अहवालात भारतामध्ये सरासरी प्रतिमहा प्रतिमाणशी दीड किलो खाद्यतेल वापरले जात आहे. खाद्यतेलाचा हा अतिवापर माणसाच्या शरीरावर घातक परिणाम करतो आहे, अनेक आजाराचे प्रमाण वाढते आहे.

* उपचारासाठी कोटय़वधी रुपये लोकांना खर्च करावे लागत आहेत. पेट्रोलनंतर सर्वाधिक आयातीवर खाद्यतेलाच्या बाबतीत खर्च होतो.

* दरवर्षी किमान ७० हजार कोटी रुपये खाद्यतेल आयातीवर खर्च करावे लागतात. अजूनही ६० टक्केपेक्षा अधिक खाद्यतेल आपल्याला आयात करावे लागत आहे.

* त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. जे खाद्यतेल आयात होते, त्यात कच्चे तेल व रिफाइंड तेल याचे प्रमाण अधिक आहे.

* पाम तेलाचा अतिवापर हा शरीराला घातक आहे. मात्र या बाबतीत फारसे कोणी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

डाळीच्या बाबतीत २०१५ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले व डाळीचा बाबतीत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवत देश आता स्वयंपूर्ण झाला आहे. तेलबियाच्या बाबतीतही आपण स्वयंपूर्ण व्हावे असा प्रयत्न केला जातो आहे. शास्त्रज्ञ नवनवीन वाण शोधताहेत. ज्यातून उत्पादकता वाढते आहे, शेतकरीही या वाणाचा पेरा करत उत्पादन वाढवत आहेत. मात्र खरी गरज आहे ते अनावश्यक वापर कमी करणे याकडे लक्ष देण्याची.