भाजपाचे बंडखोर आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. राऊतांनी निवडणीच्या आधी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाची साथ सोडून शिवसेनेत गेलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत केवळ २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले.

सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये समीकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. यामध्ये बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपाला जाहीर पाठींबा दिला. राजेंद्र राऊत यांनी आज (२६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल हे दोघेही पारंपारिक शत्रू आहेत. राजेंद्र राऊत यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा विधानसभाही गाठली. त्यानंतर सोपल यांनी २००९ मध्ये राऊतांचा पराभव केला. २०१४ मध्येही सोपल यांनी पराभव करत विधानसभा गाढली होती. आता २०१९ मध्ये राऊत यांनी सोपलांचा पराभव करत विधानसभा गाठली.

संजय शिंदेंचाही भाजपाला पाठींबा –
सोलापूर जिल्ह्यातून निवडूण आलेले आणखी एक अपक्ष आमदार संजय शिंदे यांनीही भाजपाला पाठींबा दिला आहे. निवडणूक होऊन एक दिवस उलटण्याच्या आतच राष्ट्रवादी पुरस्कृत संजय शिंदे हे भाजपच्या वळचणीला गेल्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

सोलापुरात भाजपला चार, तर राष्ट्रवादीला तीन जागा
एखाद दुसरा अपवाद वगळता चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ात अकरापैकी चार जागा भाजपने पटकावल्या, तर शिवसेनेने आपली एक जागा कायम राखली. राष्ट्रवादीने तीन जागा मिळविल्या तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षांना मिळाल्या.

सोलापूर शहर उत्तर – विजय देशमुख
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे, काँग्रेस<br />अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी , भाजपा
सांगोला – शहाजी पाटील, शिवसेना
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
करमाळा – संजय शिंदे, अपक्ष
बार्शी – राजेंद्र राऊत , भाजपा
माळशिरस – राम सातपुते, भाजपा
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी