09 August 2020

News Flash

शेतमालाच्या विक्रीसाठी डिजिटल व्यासपीठाचा आधार

शेतमाल विक्रीसाठी विनाशुल्क व्यासपीठ; महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना लाभ

संग्रहित छायाचित्र

मोहन अटाळकर

काढणीनंतर शेतमाल बाजारात विक्रीला नेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना बाजारात संरक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती. त्यातच करोनाच्या प्रादुर्भावानंतर टाळेबंदी लागू झाली आणि शेतकऱ्यांचे अवसानच गळाले. अशा स्थितीत ‘मार्केट मिर्ची डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचे विनाशूल्क व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

‘कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतमाल ग्राहकाला पोहचेपर्यंत अनेक मध्यस्थांकडून जातो. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसल्याने त्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने माल विकावा लागतो. तर अनेक मध्यस्थांच्या साखळीमुळे ग्राहकाला जास्त किंमत मोजावी लागते. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. ‘मार्केट मिर्ची डॉट कॉम’ हे संकेतस्थळ थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी उपलब्ध करून देते. आपल्याला आवश्यक तेवढा शेतमाल जाहिरात करून विकता येतो,’ असे नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी या गावचे शेतकरी किशोर कडू सांगतात.

कडू यांनी आपल्या शेतातील तूर, सोयाबीन, हरभरा अनेक ग्राहकांना विकला आहे. तेही त्यांनी स्वत: ठरविलेल्या किमतीत.

‘ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर शेतमालाची गरज भासल्यास चार-पाच शेतकरी मिळून तो शेतमाल उपलब्ध करून देऊ शकतात. आपण बाजारातील स्थिती पाहून दरही ठरवू शकतो, हे स्वातंत्र्य यात आहे,’ असे किशोर कडू सांगतात.

‘मी अंजिराच्या रोपांची लागवड केली होती. अंजिरांची रोपे विकावी कशी हा प्रश्न होता. खरे तर आपल्याकडे, अशा प्रकारचे हे धाडसच होते. मी ‘मार्केट मिर्ची’वर जाहिरात केली आणि अवघ्या काही दिवसांतच केरळ, उदयपूर येथून ऑर्डर्स आल्या. विशेष म्हणजे हे सर्व मोबाइलवरून विनाशुल्क करता येते,’ असे नागपूर जिल्ह्य़ातील डोंगरगावचे शेतकरी संतोष शर्मा सांगतात.

शेतकऱ्यांना फायदा

सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सल्लागार प्रगती गोखले यांच्या संकल्पनेतून शेतकरी, ग्रामीण कृषी उद्योजक आणि बचतगटांसाठी हे संकेतस्थळ साकार झाले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा अनुभव या कामी आला. अनेक लोकप्रिय व्यावसायिक अ‍ॅप्सच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले हे विनामूल्य संकेतस्थळ खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात दुवा म्हणून काम करते. शेतमाल उत्पादनांसाठी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देतानाच संबंधितांना खरेदी करण्यासही मदत करते. शेतकऱ्यांना या व्यासपीठावर आपल्या उत्पादनांच्या जाहिराती प्रकाशित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असंख्य शेतकऱ्यांना टाळेबंदीच्या काळात या उपक्रमाचा मोठा फायदा झाला आहे.

केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचे असलेले अवलंबित्व संपविण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच ‘मार्केट मिर्ची’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मेरा मोबाइल मेरा मार्केटिंग’ हे मिशन सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोबाइलवरूनही शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यापासून शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्राच्या विविध भागांसह उत्तराखंड, केरळ आणि इतर राज्यांतील दुर्गम भागांतूनही शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. हजारो शेतकरी आणि खरेदीदारांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे संचालक अनिल काकोडकर आणि एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत यांनी या संकल्पनेला सहयोग दिला. आम्ही विक्रेते आणि खरेदीदारांकडून त्यांच्या कृषी उत्पादनांची जाहिरात तयार करण्यासाठी एक पैसाही आकारत नाही. हे पोर्टल संपूर्णपणे मोबाइलसाठी अनुकूल असून इतर अ‍ॅप्सप्रमाणे डाऊनलोड करण्याची गरज नाही, असे या संकेतस्थळाला मूर्त रूप देणाऱ्या प्रगती गोखले यांनी सांगितले.

सुविधेचा लाभ कसा

शेतकरी किंवा बचतगटांकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंसाठी या संकेतस्थळावर एक लिंक तयार करण्यात आली आहे. धान्य, डाळी, भाज्या, वनौषधी, दुग्धोत्पादने, तेलबिया, फुले अणि फळे यांची विक्री यातून करता येते. देशातीलच नव्हे, तर युक्रेन, श्रीलंका, भूतान येथील शेतकरी आणि बचतगटदेखील या डिजिटल सुविधेचा लाभ घेत आहेत.

कृषी उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहकार्याने विनामूल्य पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शेतकरी, बचत गट, ग्रामीण कृषी उद्योजक आपल्या उत्पादनांची जाहिरात या माध्यमातून करू शकतात. ग्रामीण उत्पादकांना पूर्णपणे मोफत स्वरूपात ही सुविधा देण्यात येत आहे.

– प्रगती गोखले, सल्लागार, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:25 am

Web Title: basis of a digital platform for the sale of agricultural commodities abn 97
Next Stories
1 शिवसेनेतील अंतर्गत वादातूनच नगरसेवकांचे पक्षांतर
2 रत्नागिरीत ४० नवे करोनाबाधित
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे २६२ नवे रुग्ण
Just Now!
X