महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना टाळेबंदीत निराश्रित, निराधार, बेघरांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील नऊ केंद्रासह आणि मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर असे सुमारे ९२५ थाळी अन्न वाटप केले जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराश्रितांसाठी वरदान म्हणून सिद्ध होत आहे. शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून आता पाच रुपये करण्यात आली आहे. तसेच शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी ११ ते दुपारी तीन अशी वाढविण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.

जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ९२५ थाळ्यांचे वाटप केले जात आहे.

टाळेबंदीमुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवणे अत्यावश्यक झाल्याने आता या शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलले असून आता बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या  शिवभोजन थाळीचे वितरण करतांना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी असे या शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे.