द्राक्षावर फवारण्यात येणाऱ्या विषारी औषधामुळे वटवाघळाचे अस्तित्वचे धोक्यात आले असून सांगलीच्या आयर्वनि पुलाजवळ असणारे वटवाघळाचे अधिवास ५० टक्क्यांनी रिकामे झाले आहे. वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर, वटवाघळासारखा निशाचर प्राणी चिमणीप्रमाणे दुर्लभ ठरण्याची भीती पशुपक्ष्यांचे जीवित रक्षण करणाऱ्या ‘इन्साफ’ या संघटनेने व्यक्त केली आहे.
वटवाघळ हा निशाचर प्राणी असून त्यांचे मुख्य अन्न सुरक्षा करणारे िपपळ, वड या वृक्षांची विकासासाठी मोठय़ा प्रमाणात तोड करण्यात आली. यामुळे या वटवाघळांनी गेल्या वर्षी वड्डी ता. मिरज येथील द्राक्ष बागेवर हल्ला केला होता. शेकडोंच्या झुंडीने रात्रीच्या वेळी येणाऱ्या वटवाघळांनी बागेतील द्राक्षांचा फडशा पाडला होता. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिल्या नंतर वनविभागाने पाहणीही केली होती. शेतकऱ्यांना बागेचे संरक्षण करण्यासाठी जाळीचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
तथापि, हीच तयार गोड द्राक्षे वटवाघळाच्या मुळावर उठली असून गेल्या वर्षभरात सांगलीवाडी येथील कृष्णा काठाला असणाऱ्या वटवाघळांच्या वस्तीतील संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. दिवसभर झाडाला उलटे टांगून घेणारी वटवाघळे दिवसागणिक कमी होत चालली असून हजाराची वस्ती असणाऱ्या वटवाघळांची संख्या आता चारपाचशेवर पोहचली आहे.
द्राक्षावर किडीपासून संरक्षण करण्यासाठी रिझेंट, स्प्रिटॅल, सोराझीन सारखी विषारी कीटकनाशके शेतकरी फवारत असल्याने याचे गंभीर परिणाम वटवाघळावर होत असल्याचे इन्साफ संघटनेचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले. औषधांचे दीर्घकालीन परिणाम वटवाघळासारख्या सस्तन प्राण्यावर होत असून त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था वनविभागाने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अधिवास असणाऱ्या ठिकाणी चोरटय़ा शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. सांगलीतील ‘विसावा’ संघटनेचे संजय साळुंखे यांनी चार महिन्यांपूर्वी वटवाघळाची शिकार करणाऱ्या मुलांना हुसकावले होते. मात्र वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे श्री. मुजावर यांनी सांगितले.