गावपातळीवरील कारभार ऑनलाईन करण्यासाठी सरकारने ग्रामपंचायतींना संगणकासह इतर सुविधा दिल्या. मात्र, ग्रामसेवक कारभार संगणकीकृत करण्यास तयार नसल्याचे दिसते. अनेकदा संधी देऊनही ग्रामसेवक जुमानत नसल्याने अखेर दोन ग्रामसेवकांना निलंबित करून इतर ग्रामसेवकांनी कारभार ऑनलाईन न केल्यास थेट बडतर्फ करण्याची तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावी लागली.
जिल्ह्य़ातील १ हजार १९ ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी सरकारने सर्व ग्रामपंचायतींना संगणक व इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. संग्राम कक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायती जोडण्याचा धडक कार्यक्रम राबवला जात आहे. संगणक येऊन वर्ष लोटले, तरी अनेक ग्रामसेवकांनी आपला कारभार हातानेच करण्याचा सपाटा लावला आहे. १९६२पासून अभिलेखे ऑनलाईन करण्यासाठी अनेकदा कालावधी वाढवून देऊन संधी देण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांच्या आदेशाला वदतील ते ग्रामसेवक कसले? मंत्रालय स्तरातून सातत्याने ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी विचारणा केली जात आहे. नागरिकांना आपले प्रमाणपात्र तत्काळ मिळावे, या साठी ही योजना असली तरी ग्रामसेवकांचे यात नगदी नुकसान होत असल्यामुळे वेळकाढूपणाचे धोरण घेतले जात आहे.
जन्म, मृत्यूच्या ऑनलाईन नोंदीसह मॉडेल अकौंटिंग सिस्टिम, कर मागणी, रजिस्टर नोंदी आदी कामे ऑनलाईन करण्यात येत आहेत. या साठी संबंधित ग्रामसेवकांना प्रशिक्षणही देण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत संग्राम कक्षामार्फत ग्रामसेवकांनी ही कामे ऑनलाईन करायची आहेत. पण संगणक व इतर सुविधांवर कोटय़वधीचा खर्च करूनही नागरिकांना वेळेवर सेवा व प्रशासकीय यंत्रणेत गतिमानता येत नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी अखेर ऑनलाईन प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या पाटोदा पंचायत समितीतील ए. एस. जमदाडे व टी. सी. गावीत या दोघांना निलंबित केले. संग्राम कक्षामार्फत कारभार ऑनलाईन न करणाऱ्या ग्रामसेवकांनाही थेट बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या प्रधान सचिवांनीही या संदर्भात जिल्हयातील ऑनलाईन कामाचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला.