चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळ हिरापूर येथील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने शनिवारी मध्यरात्री एक अस्वल ठार झाले. दरम्यान, जंगलाच्या मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव धावत असल्याने गेल्या काही दिवसात रस्ते अपघातात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
हिरापूर हे गाव जंगलाला लागून असल्याने या गावात सातत्याने वन्यजीवांची ये-जा असते. शनिवारी मध्यरात्री या महामार्गावर जंगलातून एक अस्वल आले.
या अस्वलाच्या मागाहून भरधाव आलेल्या वाहनाने अस्वलाला धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान, याच वेळी पोलिस गस्तीवर होते. त्यांना रस्त्यावर अस्वल मृतावस्थेत सापडल्यावर या घटनेची माहिती पोलिसांनी शंकरपूरचे वनपरिक्षेत्र सहायक डांगे यांना देताच ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी पंचनामा करून सकाळी अस्वलाचा मृतदेह वन कार्यालयात आणला. तेथे शवविच्छेदनानंतर अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसात रस्त्यांवरील अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. जंगलातून जाणाऱ्या महामार्गाने किंवा रस्त्याने दुचाकी व चारचाकी वाहने ताशी २० किलोमीटर वेगाने चालवावी, असा नियम आहे. मात्र, ही वाहने भरधाव जातात.
प्रत्यक्षात जंगलातून जाणारा रस्ता वन्यप्राण्यांचा असतो. मात्र, आता हे रस्तेच वन्यजीवांच्या जीवावर उठले आहे. काही दिवसांपूर्वी बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर अशाच अपघातात अस्वल व तिच्या पिल्लाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर चंद्रपूर-जुनोना-कारवा-बल्लारपूर या मार्गावर भरधाव वाहनाने अनेक बिबटय़ांचा बळी घेतला आहे, तर चंद्रपूर-मूल मार्गावर वाघ आणि बिबटय़ांना जीव गमवावा लागला आहे.