पाच राज्यात पराभव झाल्यानंतर ते आता काय पण देतील परंतु पाच राज्यांनी घरी बसवले तसे आता त्यांना घरी बसवा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केले. या सरकारच्या काळात कोणी ही सुखी नाही. लोकांचे १५ लाख कुठे आहे ? एका व्यक्तीने मोदींना विचारले की १५ लाख कुठे आहे. मोदी त्याला म्हणाले की, ‘ मैंने एक साल मे गंगा किनारे कितने दिये लगाये ?’ माणूस म्हणाला ३ हजार दिये लगाये, मोदी म्हणाले तो पाच साल मे १५ लाख दिये ना अशा कोपरखळ्याही छगन भुजबळ यांनी लगावल्या.

पेट्रोलचे भाव मोदींच्या वया पलीकडे, ते आडवाणीच्या वयापुढेही जाईल आणि हे सरकार राहीले तर ते आपले एमडीएच मसाले वाले आजोबाच्या वयापुढे जाईल असा टोला लगावला. पूर्वी गोणीभर सामान यायचे परंतु यांच्या सरकारच्या काळात पिशवीत सामान आणावे लागत आहे हेच सरकार जर राहिले तर सामान खिशात आणावं लागेल असे ही छगन भुजबळ म्हणाले. मला मुद्दाम जेलमध्ये टाकले, शंभर कोटीच्या कामात मला साडे आठशे कोटी रुपये मला कसे मिळतील ? म्हणजे ५ फुटांच्या म्हशीला १८ फुटाचं रेडकू कसं होईल असा सवाल महाराष्ट्र सदन बांधकामावर छगन भुजबळ यांनी केला.

उद्योगधंद्यात व गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरवर होता तो आज तिसर्‍या क्रमांकावर आला हे कुणाचे पाप आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केला. अहमदाबाद बुलेट ट्रेन करण्याऐवजी कर्जतचे स्टेशन नीट करा. सव्वा लाख कोटी रुपये ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तयार करत आहेत असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.