प्रेमप्रकरणातून नितीन आगे (खर्डा, ता. जामखेड) या मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येचे प्रकरण ताजे असतानाच अशाच कारणावरून श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे युवकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी तब्बल पंधरा दिवसांनी गुन्हा दाखल झाला असून, मारहाण करण्यात आलेला युवक अत्यवस्थ आहे. त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे दि. २२ जूनला दुपारी भररस्त्यावर ही घटना घडली. काही जणांनी भाऊ ज्ञानदेव काळे (वय २०, रा. रुईगव्हाण, तालुका कर्जत) जबर मारहाण केली. तेव्हापासूनच तो अत्यवस्थ असून याप्रकरणी त्याचा भाऊ सतीश ज्ञानदेव काळे यांनी सोमवारी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अमोल माणिक पाचपुते, योगेश पाचपुते (पूर्ण नाव नाही), संजय महादेव पाचपुते, अश्पाक नूरमहंमद शेख व शरद हेकांड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्यापि अटक झालेली नाही.
या घटनेतील जखमी भाऊ काळे याचा भाऊ सतीश याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की प्रेमसंबंधाच्या गैरसमजुतीतून दि. २२ जूनला वरील लोकांनी भाऊ काळे यास गज, काठय़ा, चामडय़ाच्या पट्टय़ाने जबर मारहाण केली. यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. काष्टी येथील स्मशानभूमीजवळ नदीपात्रातच त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. या फिर्यादीनुसार सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस उकिर्डे पुढील तपास करीत आहेत.