दिगंबर शिंदे

हल्लेखोरांवर अद्याप कारवाई नाही; सत्ताधारी कार्यकर्त्यांवर आरोप

करोनाचे संकट परतवून लावण्यासाठी शासन यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्नशील असताना जिल्हय़ातील इस्लामपूर आणि विटा येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण किंवा शिवीगाळीचे प्रकार झाले ते गंभीर आहेत. जिल्ह्य़ाचे पालकत्व असलेले जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याच गावात, जिल्हय़ात असे प्रकार होत असतील तर येथे कायद्याचे राज्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. वैयक्तिक लाभाआड येणाऱ्या अधिकाऱ्यांवर हात उचलणे ही बाबच चिंताजनक असून केवळ करोनाविरुद्धची लढाई सुरू असल्याने याचे तीव्र पडसाद उमटले नाहीत. या हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारीच असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

गेल्या आठवडय़ामध्ये इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार-पोतदार यांना राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी शिवीगाळ करीत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. करोनामुळे अतिजोखमीचा भाग म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भागात मद्यपुरवठा आणि तोही नगरपालिकेच्या कचरा गाडीतून करण्याचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही शिवीगाळ करण्यात आली. सत्तेच्या जोरावर आपण म्हणू ती पूर्व दिशा करण्याची मानसिकता यातून दिसून येते, याचबरोबर लोकनियुक्त नगराध्यक्षपद भाजपप्रणीत आघाडीकडे आहे. असे असताना कायदा, नियम बासनात बांधून वर्तन-व्यवहार करणे लोकप्रतिनिधी, शहराचे कारभारी म्हणून कार्यरत असणाऱ्यांना अशोभनीय आहे.

अशीच दुसरी एक घटना रविवारी विटा येथे घडली. कुस्तीमध्ये देशभर नाव कमावलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना कार्यालयाच्या आवारात येऊन मारहाण केली. वाळूचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी करण्यात आलेला दंड कमी करण्यास तहसीलदारांनी नकार दिल्याने ही मारहाण करण्यात आली. चंद्रहार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे इस्लामपूर आणि विटा येथील मारहाणप्रकरणी संशयित असलेले राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

पालकमंत्री जयंतराव पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. आज त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते जर बेताल वागत असतील तर कारवाई करून आपला वर्तन-व्यवहार शुद्ध आहे हे दाखविण्याची संधी यानिमित्ताने पालकमंत्री पाटील यांना लाभली आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्वच यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहेत. पोलीस रस्त्यावर आहेत, आरोग्य विभाग घरोघरी पोहोचून करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगरपालिका संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. असे असताना असे प्रकार केवळ निंदनीयच नव्हे तर दंडनीयही आहेत असेच म्हणावे लागेल. इस्लामपूर येथील मद्य दुकान कोणाचे होते, दुकाने बंद असताना मद्य कसे बाहेर पडते, मद्य वाहतूक होतच नव्हती तर शिवीगाळ मजेने झाली असे म्हणता येईल का आणि उगीच कोणीही तक्रार कशासाठी दाखल करील, असे प्रश्न त्यातून उपस्थित होतात. याचबरोबर चोरटी वाळू वाहतूक आजपर्यंत कशी चालू होती. याला महसूल विभागातील काहींचा छुपा आशीर्वाद होता का, याचाही तपास निष्पक्षपणे होण्याची गरज आहे. हात उचलण्याचे धाडस होण्यामागे केवळ अंगातील ताकदच कारणीभूत होती की राजकीय पाठबळामुळे आलेला मुजोरपणा, याचीही पाळेमुळे शोधायला हवीत.

अधिकाऱ्यांकडून तक्रार

या दोन्ही प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. जाधव यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला असून पाटील हे अद्याप फरारी आहेत. या दोन्ही प्रकरणी कारवाईची मागणी राजपत्रित अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. आठवडा उलटत आला तरी गृह विभागाला पर्यायाने पोलिसांना दोन्ही संशयितांवर कारवाई करता आलेली नाही.