चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत परशुरामाचे चित्र व कुऱ्हाड छापणे हा जातीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून, आयोजकांनी माफी मागून ही चित्रे काढली नाही तर संमेलन उधळून लावण्याचा इशारा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. याचबरोबर मराठा महासंघ व छावा संघटनांनीही याचा निषेध केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र शासन फुले-शाहू-आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता व स्त्री समानता या तत्त्वांवर चालते. परशुराम हे कौर्य, हिंसा, विषमता व ब्राह्मणी वर्चस्व यांचे प्रतीक आहे. तरीसुद्धा त्याचे चित्र व संमेलनस्थळी त्याचा पुतळा उभारला जातो, हे जातीय व वर्ण वर्चस्ववाद पसरवणारे दिसते. त्यामुळे त्याला विरोध केला जात आहे. आयोजकांनी माफी मागून या गोष्टी काढल्या नाहीत, तर संमेलन उधळले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, उद्घाटक कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही याबाबत निवेदन देऊन संमेलनाला उपस्थित न राहण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.