सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले असताना आणखी १७ नगरसेवकांवरही याच कारणासाठी धोक्याची तलवार टांगली गेली आहे. यात राष्ट्रवादीचे उपमहापौर हारून सय्यद यांच्यासह माजी महापौर आरीफ शेख, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे आदींचा समावेश आहे.
निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर करणाऱ्या नगरसेवकांची संख्या २५ असताना त्यापैकी केवळ ८ नगरवेवकांवरच अपात्रतेची कारवाई का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कायद्यानुसार ३० दिवसांत खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे. ज्या नगरसेवकांनी खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही, अशापैकी म. रफिक हत्तुरे, देवेंद्र भंडारे, राजकुमार हंचाटे, संजीवनी कुलकर्णी, परवीन इनामदार, दमयंती भोसले, विनोद गायकवाड, सुजाता आकेन आदी आठ नगरसेवकांना पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी अपात्र ठरविले आहे. परंतु ज्यांनी खर्चाचा हिशोब वेळेवर सादर न करता नंतर प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत, असे १७ नगरसेवक कारवाईविना मोकळे राहिले आहेत. यात काँग्रेसचे माजी महापौर आरीफ शेख, चेतन नरोटे, उदयशंकर चाकोते, अविनाश बनसोडे, श्रीदेवी फुलारे, रियाज हुंडेकरी, कल्पना यादव तसेच राष्ट्रवादीचे उपमहापौर हारून सय्यद व गटनेते दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, गीता मामडय़ाल, निर्मला जाधव तसेच शिवसेनेचे मनोज शेजवाल, मंगला वानकर व भाजपचे शिवानंद पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपात्रतेची कारवाई झालेल्या आठ नगरसेवकांनी मुंबईत धाव घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. या नगरसेवकांची बाजू अॅड. विश्वास देवकर यानी मांडली.