वसई-विरार शहरात गंभीर स्थिती; रुग्णवाहिकेतून रुग्णांची फरफट

वसई : वसई-विरार शहरात करोनाचा कहर अधिकच वाढू लागला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना प्र्राणवायू, अतिदक्षता व जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटांचा तुटवडा असल्याने वेळेवर प्रवेश मिळत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेत रुग्णासह करोना रुग्णालयांचा शोध घ्यावा लागत आहे.

वसई-विरार शहरातील करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने ४४ हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णसंख्येतही वाढ होऊन ती ८ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारी खासगी व शासकीय करोना केंद्रात खाटा शिल्लक नाहीत. या परिस्थितीत अनेक रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले आहे. जरी खाट मिळाली तरी त्या ठिकाणी रुग्णांच्या प्रकृतीनुसार लागणाऱ्या सुविधाही उपलब्ध होणे मोठे अडचणीचे बनले आहे.

रविवारी नालासोपारा पूर्वेतील भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. अँमरोज डिसोझा (५०) असे त्यांचे नाव असून त्यांना दुपारी ४ च्या सुमारास वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते; परंतु त्या ठिकाणी खाट उपलब्ध नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र इतका वेळ फिरूनही कुठेही खाटा शिल्लक नव्हत्या. अखेर काही वेळ रुग्णवाहिकेतील उपचारावर थांबावे लागले; परंतु स्थिती अधिकच गंभीर होत असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईत तरी जागा मिळेल या आशेवर पालिकेच्या रुगवाहिकेतून उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या वसई विरार शहरात दररोज अशा अनेक रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी परवड सुरू आहे.

रुग्णवाहिकांची रुग्णांसह भटकंती

करोनाबाधित झाल्याचे आढळून येताच रुग्णाला तातडीने उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी रुगवाहिकेचा आधार घेतला जात आहे; परंतु शहरातील परिस्थिती लक्षात घेता रुग्णांना लगेच उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे जास्तीचा वेळ लागतो. यामुळे रुग्णवाहिकेला रुग्णांना घेऊन ताटकळत थांबावे लागते, तर दुसरीकडे जागा मिळविण्यासाठी इकडून तिकडे अशी रुग्णवाहिकांची रुग्णांना घेऊन भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील लसीकरण केंदें बंद

वसई : वसईच्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातून लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे; परंतु मागील काही दिवसांपासून लशींचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसल्याने तुटवडा भासू लागला आहे. विरार ग्रामीण रुग्णालय व आगाशी, निर्मळ, कामण, भाताने, नवघर पारोळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत आठ हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

असे जरी असले तरी काही दिवसांपासून या आरोग्य केंद्रात होणारा लशींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे ही बंद ठेवावी लागत आहे. नुकताच नवघर आरोग्य केंद्र्रासाठी ३०० करोना प्रतिबंध लशी पुरविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी दिली आहे. साठा उपलब्ध होईल तशी लस देण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.