जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींचे राज्य शासनाला साकडे

पालघर: पालघर जिल्ह्यतील नव्याने आढळून येत असलेल्या करोनाबाधित  रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्यची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे  या पाश्र्वभूमीवर  पालघर जिल्हा मुख्यालयात भव्य करोना काळजी केंद्र (जम्बो सेंटर)आरोग्य सुविधांसह सुरू करण्याची मागणी जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी तसेच पालघर जिल्हा पत्रकार संघाने शासनाकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यत रुग्णवाढीचा आलेख वाढतच जात आहे. उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या घटनाही ताज्या आहेत. अशातच नव्याने स्थापन होणारे व करोना उपचारांसाठी परवानगी मिळालेली खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये अलीकडेच खाटा वाढवण्यात आल्या असल्या तरी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. रुग्णांना जिल्ह्यबाहेर खाटा शोधण्यास वणवण करावी लागत आहे.

कोळगाव येथे स्थापन झालेल्या जिल्हा मुख्यालयात विविध इमारती बांधून तयार आहेत. या इमारतींमध्ये प्रशस्त जागाही उपलब्ध आहे. या ठिकाणी पाचशे ते हजार खाटा बसतील इतके भव्य काळजी केंद्र सुरू करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्णांची फरपट लक्षात घेता  जिल्हा मुख्यालयात काळजी केंद्र सुरू केल्यास जिल्हावासीयांना दिलासा मिळेल व त्यांची वणवण थांबेल अशी  मागणी सहा आमदारांसह खासदार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  जिल्ह्यचे खासदार राजेंद्र गावित यांच्यासह आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, क्षितिज ठाकूर, सुनील भुसारा, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा आदी लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे.