सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून ठाकरे सरकारकडून स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आऱक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असल्याचं वृत्त दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. तसंच आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं चिठ्ठीतही तसा उल्लेख केल्याचं म्हटलं होतं. परंतु आता या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून व्हायरल होणारी ती सुसाईड नोट बनावट असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या केतूरा गावात राहणाऱ्या १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणामुळे त्यानं गळफास घेतल्याचं वृत्त पसरलं होतं. तसंच एक सुसाइड नोटही व्हायरल झाली होती. तसंच यानंतर अनेकांनी या घटनेची दखल घेतली होती. दरम्यान, पोलिसांनी या सुसाइड नोटचा तपास केला. तसंच त्यानंतर सुसाइड नोट आणि त्या मुलाचं हस्ताक्षर तपासून पाहण्यात आलं. त्यानंतर ही नोट बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय लिहिलं होतं चिठ्ठीत ?

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…