News Flash

बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक, २४ तासात ठोकल्या बेड्या

नांदेड पोलिसांची कारवाई

बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर २४ तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. अखेर आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

काय आहे प्रकरण –
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 6:36 pm

Web Title: beed acid attack accused arrested by nanded police sgy 87
Next Stories
1 राज्यात आज ३ हजार ६५ जणांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ९२.४५ टक्के
2 “दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणं दुर्दैवी,” पंकजा मुंडे संतापल्या
3 “सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे….”
Just Now!
X