आतापर्यंत मुलींनी पाणी पाजले, मुखाग्नी दिला, अशा घटना घडलेल्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, बीडमध्ये चार महिलांनी सासूच्या तिरडीला खांदा दिल्याची घटना समोर आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याची चर्चा बीड शहरात सुरू आहे.

बीड शहरातील काशिनाथ नगरमधील सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचं 83 व्या वर्षी सोमवारी निधन झालं. अंत्यविधीवेळीला सुरूवात झाल्यानंतर मुलांनी आणि जावयांनी खांदा दिला. पण आमच्या आईला आम्ही खांदा देणार असं म्हणत चौघी सुनांनी सुंदराबाई यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

सुंदरबाई यांना चार सुना आहेत. चौघींनाही सुंदरबाईंनी कायम मुलीप्रमाणे वागवलं. पोटच्या मुलींप्रमाणे वाढवल्यामुळे सुनांचंदेखील त्यांच्यावर प्रेम होतं. चौघींनी प्रेमापोटी प्रथेला आणि परंपरेला फाटा देत अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे अशी चार सुनांची नावं आहेत.

सुंदरबाई यांना सामाजिक कार्याची आवड होती. मयत झाल्यावर आपलेही नेत्रदान करण्याची इच्छा त्यांनी मुलांजवळ व्यक्त केली होती. सुंदरबाईंची अखेरची ही इच्छा पूर्ण झाली. बीड जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागाच्या टिमने शस्त्रक्रिया करून नेत्र संकलन केले.