लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ६ विधानसभा मतदारसंघांत काही बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरूझाले. दुपापर्यंत ४० टक्के, तर सायंकाळी पाचपर्यंत ६५ ते ७० टक्के मतदान झाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके या दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले.
बीड लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या सहा मतदारसंघांसाठी २ हजार १७४ केंद्रांवर मतदान झाले. परळी व आष्टीतील २ केंद्रांवर बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला. दुपारनंतर मतदानात चांगली वाढ झाली. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, काँग्रेसचे अशोक पाटील, प्रा.सुशीला मोराळे यांच्यासह १२ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले.
सायंकाळी पाचपर्यंत गेवराई ६३ टक्के, माजलगाव ६०, केज ५६.९७, बीड ६०, आष्टी ६३, तर परळी ६० टक्के याप्रमाणे मतदानाची नोंद झाली. बीड तालुक्यातील बेलवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना घडली.