वसंत मुंडे

शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे तब्बल दोन दशकानंतर सेनेला मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली. पण भाजप नेतृत्वाच्या प्रभावाने एका मतदार संघापुरते मर्यादित असलेल्या सेनेला तगडय़ा नेतृत्वाने विस्तारासाठी राजकीय बळ मिळाले आहे. भाजपचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख विरोधक असला, तरी युतीत भाजप नेतृत्वाला आता तगडा सहकारी स्पर्धक मिळाल्याचे मानले जात आहे. प्रस्थापित राजकारणी जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय क्षमता आणि राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा कधीच लपून राहिली नसल्याने शिवसेना पक्ष विस्तारताना भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते, असा कयास बांधला जात आहे.

बीड जिल्ह्यतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जिल्ह्यत पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहे. भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे खासदारकीसह पाच आमदार आणि बहुतांशी संस्थांवर एकतर्फी वर्चस्व आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावामुळे शिवसेना बीड या एका मतदार संघापुरतीच मर्यादित राहिली. पाच वर्षांपासून शिवसेना सत्तेत सहभागी असली, तरी जिल्हास्तरावर सेनेकडे कोणतीही सत्ता नव्हती. दोन वर्षांपूर्वी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यामुळे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे चार सदस्य निवडून आल्याने बांधकाम सभापतिपद सेनेकडे आले इतकेच. सेनेकडे सक्षम नेतृत्व नसल्याने आणि भाजपच्या प्रभावाने पक्षनेतृत्वाची इच्छा असूनही सेनेला जनाधार मिळू शकला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील चार वर्षांत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे अनेक कार्यक्रम घेऊन जिल्ह्यत सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला, तरी फारसा फायदा झाला नाही. या पाश्र्वभूमीवर पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीन वेळा विविध खात्याच्या मंत्रिपदी काम केलेले आणि विधानसभेच्या सर्व मतदार संघांत थेट संपर्क असलेले प्रस्थापित राजकारणी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेला संघटना विस्तारासाठी बळ मिळाले आहे. मराठवाडय़ात ओबीसी समूहाला शिवसेनेशी जोडण्यासाठीच प्रवेश करताच पक्षनेतृत्वाने क्षीरसागरांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचे मानले जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून तब्बल दोन दशकांनंतर जिल्ह्यत सेनेला मंत्रिपद मिळाले. भाजप-सेना युतीच्या काळात प्रा. सुरेश नवले चार वर्ष आरोग्य राज्यमंत्री होते. मात्र, नवले यांनी बंडानंतर बीड मतदार संघही सेनेच्या हातून निसटला. त्यानंतर प्रा. सुनील धांडे यांनी या मतदार संघातून एकदा विजय मिळवला. मात्र, त्यानंतर मागील दोन निवडणुकांपासून या मतदार संघावर क्षीरसागरांचेच वर्चस्व आहे. भाजपचा प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षभरापूर्वी माजी मंत्री सुरेश धस यांना थेट पक्षात घेऊन आमदार केले. तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ही पुतण्याच्या बंडानंतर भाजप नेतृत्वाच्या जवळ आल्याने त्यांचाही प्रवेश होईल अशी चर्चा होती. मात्र,  लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना पािठबा जाहीर करून जयदत्त क्षीरसागरांनी थेट शिवबंधन बांधले. मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रभावी नेतृत्व आणि फोडाफोडीच्या राजकारणाने प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीपासून गर्भगळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने कॅबिनेट मंत्री पद देऊन जिल्ह्यत भाजपसमोरही तगडे सहकारी नेतृत्व उभे केले आहे. युतीच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री तर सेनेचे प्रा. सुरेश नवले राज्यमंत्री होते. राष्ट्रवादीच्या काळात दिवंगत विमल मुंदडा त्यानंतर जयदत्त क्षीरसागर कॅबिनेट तर प्रकाश सोळंके आणि सुरेश धस राज्यमंत्री होते. या खेपेला मात्र एकाच वेळी दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहे. भाजप शिवसेनेची युती असली, तरी भाजप नेतृत्वाच्या प्रभावामुळे शिवसेनेला सत्तेत फारसा वाटा आणि विस्ताराची संधी मिळाली नाही. परिणामी पाच वर्षांपूर्वी युती तुटल्यानंतर शिवसेनेला सहा विधानसभा मतदार संघात उमेदवार शोधताना दमछाक झाली होती. जिल्ह्यतील या राजकीय परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून सक्षम राजकीय नेतृत्व मिळाल्याने सेनेला पक्ष विस्तारासाठी बळ मिळाले. त्यामुळे भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख विरोधक असला, तरी आता जयदत्त क्षीरसागर यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भाजपला तगडा सहकारी स्पर्धकच मिळाला असल्याने आगामी काळात जिल्ह्यच्या राजकारणात नवीच समीकरणे उदयाला येतील असेही राजकीय जाणकारांचे मत आहे.