बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तो रस्त्यावर येऊन उद्रेक होऊ नये यासाठीच राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावाखाली ३१ मे पर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता ५ जून रोजी कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दिली.  लिंगायत, मुस्लीम, धनगर  या समाजालाही बरोबर घेऊन सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध हा मोर्चा असेल. मराठा समाजाला न्याय देता येत नसेल तर ठाकरे आणि चव्हाण यांनी सत्ता सोडावी, अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार बैठक घेऊन ५ जून रोजीच्या मोर्चाची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर टीका केली. महाविकास आघाडीच्या सरकारने सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नात संशयास्पद भूमिका घेतली. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात पाच पैकी दोन न्यायमूर्तींनी आरक्षणाचा कायदा अधिकार राज्य सरकारला असल्याचे मत मांडले.