News Flash

बीड जिल्हा परिषदेवर धनंजय मुंडे यांचा पुन्हा वरचष्मा

धनंजय मुंडे यांनी सर्व सदस्यांचे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानताना जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली .

संग्रहित

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापती पदीही महाविकास आघाडीच्या रूपाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा वरचष्मा पाहायला मिळाला. चारही सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या हे विशेष!

धनंजय मुंडे यांनी यशस्वीरीत्या सोशल इंजिनिअरिंग साधत महा विकास आघाडीच्या माध्यमातून माजलगाव तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य जयसिंह धैर्यशील सोळंके (समिती नंतर समजणार), माजलगाव तालुक्यातील कल्याण आबुज यांची समाज कल्याण सभापती पदी, गेवराई तालुक्यातून भाजपच्या गटातून महा विकास आघाडीमध्ये दाखल झालेल्या सौ. सविता बाळासाहेब मस्के (समिती नंतर समजणार), तसेच गेवराई तालुक्यातीलच शिवसेनेच्या यशोदाबाई बाबुराव जाधव यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड घोषित करण्यात आली.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ३२ विरुद्ध २१ अशी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला शह देत मागील फोडाफोडीचा वचपा काढला होता. त्यानंतर आज झालेल्या सभापती निवडी मध्ये तर संख्याबळ पाहून भाजपने माघार घेतल्याने सर्व विषय समित्यांवर धनंजय मुंडे यांचा वरचष्मा झाला आहे.

भाजप वर नामुष्की
दरम्यान जिल्हा परिषद सदस्यांची फोडाफोडी करून गाजावाजा करून जिल्हा परिषद ताब्यात घेतलेल्या बीड भाजपला सभापती निवडीमध्ये माघार घ्यावी लागली आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या अध्यक्ष निवडीच्या वेळी २१ वर आली होती, आज सभापती निवडीच्या वेळी आणखी काही सदस्य कमी होऊ नयेत या भीतीनेच भाजपने या निवड प्रक्रियेतून माघार घेतली असल्याचे बोलले जाते; तूर्तास चारही समित्यांची बिनविरोध झाल्याने भाजपवर नामुष्की ओढवली हे मात्र नक्की!

पारदर्शक कारभार करू – धनंजय मुंडे
दरम्यान या निवडीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व सदस्यांचे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानताना जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली .
राज्यात आणि जिल्हा परिषदेत एकाच आघाडीचे सरकार आल्याने विकासाला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सदर निवडी बिनविरोध झाल्याबद्दल बोलताना कदाचित भाजपाने आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली असेल असा टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 6:13 pm

Web Title: beed local body election dhananjay munde dmp 82
Next Stories
1 अजून किती नीच पातळी गाठणार; धनंजय मुंडेंचा भाजपावर हल्लाबोल
2 प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंद मागे
3 राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X