वसंत मुंडे, बीड

राष्ट्रवादीकडून उमेदवार शोधण्यासाठी सुरू असणारी कसरत आणि भाजपकडून होणारी विकासकामांची उद्घाटने यामुळे बीड जिल्हय़ातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील, असे अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले असले तरी लोकसभेची ही निवडणूक महिला बाल विकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच रंगणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची नावे उमेदवारीसाठी चच्रेत आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेस वर्चस्वाचा. दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस फोडा आणि विजय मिळवा या राजनीतीने काँग्रेसच्याच रजनी पाटील यांना भाजपकडून उभे करत केशरकाकू यांचा पराभव केला. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी तीन वेळा भाजपकडून, तर एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. गोपीनाथ मुंडे यांनी दोन वेळा मताधिक्याने विजय मिळवत मतदारसंघावर पकड मजबूत केली. दोन्ही निवडणुकांत मुंडे विरुद्ध पवार असा सामना रंगला आणि  स्थानिक पातळीवर ‘ओबीसी’ विरुद्ध ‘मराठा’ या ध्रुवीकरणात मुंडेंनी बाजी मारली. मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉ. प्रीतम  यांनी देशात मताधिक्याचा  विक्रम नोंदवला. मुंडे यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना अडीच लाख मते मिळाली होती. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, नगरपालिका, पंचायत समित्यांवरही भाजपचे वर्चस्व आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी चार वर्षांत विकासकामांसाठी मोठा निधी आणल्याचा दावा केला आहे. तीन दशकांपासून चच्रेत असलेला परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाच्या कामालाही मुंडे भगिनींनी गती दिल्याने सार्वजनिक विकासाच्या बळावर एकतर्फी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास मुंडे भगिनींकडून जाहीरपणे व्यक्त केला जातो.

राजकीय पातळीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर हे दोघेही आता भाजपमध्ये आहेत. गेवराई मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करून मंत्री मुंडे यांनी आपल्या राजकीय भात्यात हक्काचा बाण ठेवला आहे. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ही स्थानिक पातळीवर बरोबर घेऊन याही मतदारसंघात मतांची बेरीज केली आहे. माजलगाव मतदारसंघात विधानसभा उमेदवारीच्या अपेक्षेने मोहन जगताप, केज मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांबरोबर तडजोडीचे आडाखे बांधल्यामुळे विधानसभेच्या सहाही मतदारसंघांतून भाजपला मताधिक्य मिळवण्याचे राजकीय डावपेच मुंडे यांनी आखल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मदार परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, माजलगाव मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके, केज मतदारसंघात अक्षय मुंदडा आणि माजी आमदार अमरसिंह पंडित या दिग्गज नेत्यांवर आहे. आष्टीत भाजपचे बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भाजप आमदार भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांच्या तुलनेत ते किती प्रभाव टाकू शकतात, यावर राष्ट्रवादीच्या मतांचे गणित ठरणार आहे. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मिळालेला प्रतिसादही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप महायुतीतील घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे आणि मंत्री मुंडे यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे मेटे काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे.

विधानसभेतील राजकीय चित्र

बीड-    राष्ट्रवादी

परळी-  भाजप

गेवराई- भाजप

आष्टी-  भाजप

केज-    भाजप

माजलगाव-     भाजप

केंद्रात आणि राज्यात पक्षाची सत्ता असताना खासदार एकही उल्लेखनीय काम करू शकले नाहीत. केवळ लोकात जाऊन नमस्कार करणे एवढेच ते काम करू शकल्या. पारपत्राचे कार्यालय ढोल वाजवून सुरू केले, पण त्याला कुलूप लागल्याचे त्यांना माहीत नाही. परळी-बीड-नगर रेल्वेचे काम पूर्णपणे अपूर्ण आहे. जमीन संपादनात दुजाभाव झाला, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. बीड, परळीचे तर सत्तर टक्के काम अपूर्ण आहे. मग आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या विद्यमान खासदार कोणत्या कामावर मत मागतात आणि जनतेने त्यांना मत का द्यावे? सत्ता असून त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे.

– अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस

बीड जिल्हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला असल्याने साडेचार वर्षांच्या कालावधीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सत्तेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणत रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, जलयुक्त शिवार या कामातून जिल्ह्य़ाला विकास काय असतो, हे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र केवळ जातीवाद निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दोन्ही पक्षांच्या नेतृत्वातील फरक लक्षात आल्यामुळे आगामी निवडणुकीत विकासाच्या अजेंडय़ावर भाजपला पूर्ण समर्थन मिळेल. – रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष भाजप

काही मुद्दे भाजपसाठी त्रासदायक

राजकीय पातळीवर भाजपचा प्रभाव असला तरी केंद्र सरकारच्या विविध जाचक कर प्रणालीमुळे व्यापारी वर्ग तर शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. परळी-नगर रेल्वेचे आश्वासनही अपूर्ण असून मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले असले तरी फारसे काही पदरात पडले नाही आणि धनगर आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याची भावना आहे.