बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच पक्ष संपवतील असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे उमेदवार रमेश कराड यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा डाव त्यांच्यावरच उलटवल्याची चर्चा रंगली.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांच्या पक्षाची वाताहात केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. एवढेच नाही तर जे लोक राष्ट्रवादी या पक्षासोबत निष्ठेने वागतात त्यांच्यावर पक्ष अन्याय करतो, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. पक्षातल्या लोकांनी अशी वागणूक दिल्यामुळेच सुरेश धस आमच्यासोबत आहेत असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपा नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खेळी केली आणि रमेश कराड यांनी आपला अर्ज मागे घेतला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांनी या निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना धक्का दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र आज पंकजा मुंडे यांनी त्यावर कुरघोडी केली. रमेश कराड यांनी जेव्हा अर्ज मागे घेतला तेव्हा राजकीय वर्तुळात हीच चर्चा रंगली होती. आता बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच बीडमध्ये पक्ष संपवतील अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.