दहावीच्या निकालात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९५.०२ टक्के निकालासह बीड जिल्ह्याने बाजी मारली. सलग ३ वर्षांपासून बीडने ही किमया साध्य केली. मुलांपेक्षा मुलीच पुढे असून, गुणवंतांची यादी नसली तरी अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन गुणांची स्पर्धा कायम ठेवली. जिल्ह्यातील दीडशे शाळांनी निकालाची शंभरी गाठली, हे विशेष.
मागील काही वर्षांपासून गुणवत्ता यादी नसल्यामुळे मुलांचा कौतुक सोहळा कोठे झाला नाही. बहुतांशी लोकांकडे आता मोबाईलवर इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याने मुलांचे निकाल पालकांनी घरीच पाहिले. एकूण ६१६ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ३८ हजार १०३ विद्यार्थ्यांपकी ३६ हजार २०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २२ हजार ५११ मुलांपकी २१ हजार २५९ मुले (९४.४४ टक्के), तर १५ हजार ५९२ मुलींपकी १४ हजार ९४७ मुली (९५.८६ टक्के) उत्तीर्ण झाल्या.
सर्वाधिक निकाल आष्टी तालुक्याचा (९७.४४ टक्के) लागला. बीड ९६.२२, पाटोदा ९६.०६, गेवराई ९६.६९, अंबाजोगाई ९३.३१, केज ९५.५३, परळी ९३.०६, धारूर ९३.७८, शिरूर ९५.९१, वडवणी ९६.०२. सर्वात कमी निकाल माजलगावचा (८९.७७ टक्के) लागला. बेस्ट ऑफ फाईव्हमुळे बहुतांश शाळांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागले. गेल्या वर्षी बीडचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. मार्च २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८८.२४ टक्के लागला होता. औरंगाबाद विभागात औरंगाबाद, परभणी, जालना, िहगोली व बीड या पाच जिल्ह्यांतून गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्हा अव्वल ठरला.
दीडशे शाळांनी गाठली शंभरी
एकूण ६१६ पकी १५१ शाळांचे निकाल १०० टक्के लागले. ‘बेस्ट फाईव्ह’चा फायदा मोठय़ा प्रमाणावर झाला असून विद्यार्थ्यांच्याही गुणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हिंगोलीचा निकाल ८३.४४ टक्के
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल ८३.४४ टक्के लागला. परीक्षेला १४ हजार १९४ विद्यार्थी बसले होते. पकी ११ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतून सेनगावचा निकाल सर्वाधिक (८६.८१ टक्के) लागला. २ हजार ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३ हजार ९४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४ हजार ५३४ विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर १ हजार ३२७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुकानिहाय टक्केवारीत मानव विकास मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या सेनगाव तालुक्याचा निकाल ८६.८१ टक्के, तर औंढा नागनाथ ८६.१० टक्के, िहगोली ८३.७९ टक्के, कळमनुरी ७६.३३ टक्के, वसमत ८३.५४ टक्के असा निकाल आहे.
लातूर पॅटर्नची कामगिरी
वार्ताहर, लातूर
दहावीच्या परीक्षेत लातूर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी (८६.३८ टक्के) लागला. लातूर विभागात मात्र लातूर जिल्हय़ाची निकाल (९०.४८ टक्के) नेहमीप्रमाणे आघाडी आहे.
विभागातून १ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. पकी ९९ हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेस बसले व ८५ हजार ८६३ उत्तीर्ण झाले. नांदेडचे प्रमाण ८१.१३, तर उस्मानाबादचे ८८.८७ टक्के आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.१५, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.९७ टक्के आहे. नांदेडमध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण केवळ ७९.५२ टक्के आहे. लातूरमध्ये मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.७५, तर मुलांचे ८९.५३ टक्के आहे.
लातूर जिल्हय़ातील मुला-मुलींच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात फारशी तफावत नसली, तरी उस्मानाबाद व नांदेड जिल्हय़ात अनुक्रमे ५ व ४ टक्के तफावत आहे. विभागात १०० टक्के निकाल असणाऱ्या १७३ शाळा, तर शून्य टक्के निकाल असणाऱ्या ९ शाळा आहेत. ३० टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या २० आहे. ज्या शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे त्या शाळांचे अनुदान स्थगित करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक कार्यालयास केली जाणार आहे.
लातूर विभागात नांदेडची घसरण
वार्ताहर, नांदेड
दहावीच्या परीक्षेत लातूर विभागामध्ये नांदेड जिल्हा निकालात तळाला असून, एकत्रित निकालाची टक्केवारी ८१.१३ टक्के आहे. यात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली. तब्बल ८३.०५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ७९.५२ टक्के आहे. जिल्हय़ातील ३५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. शून्य टक्के निकाल असलेल्या ७ शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या ३ शाळा आहेत.
राज्याच्या तुलनेत लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८६.३८ टक्के) असून, लातूर विभागात नांदेडचा निकाल सर्वात कमी (८१.१३ टक्के) आहे. लातूर जिल्हय़ाचा निकाल ९०.४८, तर उस्मानाबादचा ८८.४७ टक्के आहे. नांदेडच्या १६ तालुक्यांतून ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यात मुलांची संख्या २१ हजार १३८, तर मुलींची १७ हजार ७२० आहे. मुलांपैकी १६ हजार ८०८ (७९.५२ टक्के), तर मुलींपैकी १४ हजार ७१७ (८३.०५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुकानिहाय टक्केवारी पाहता नांदेड तालुक्याचा निकाल ८३.७५ टक्के लागला. अर्धापूर (७७.३६), भोकर (७५.९८), बिलोली (८५.५३), देगलूर (८०.२८), धर्माबाद (७९.७५), हदगाव (७४.६०), हिमायतनगर (७२.०१), कंधार (८७.९४), किनवट (७८.३७), लोहा (८२.६२), माहूर (८१.०७), मुखेड (८४.३९), मुदखेड (७१.६०), नायगाव (८२.५२) व उमरी तालुक्याचा निकाल ७८.९५ टक्के लागला.
विभागात पाच वर्षांपासून उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले
प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्य़ाचा दहावीचा निकाल ९१.८२ टक्के लागला. जिल्ह्य़ात ५८ हजार ६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ५३ हजार २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे.
औरंगाबाद विभागीय मंडळात बीडची गुणवत्ता सर्वाधिक असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. उत्तीर्णतेत जालना दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या स्थानावर असल्याचे निकालात दिसून येते. गेल्या ५ वर्षांत औरंगाबाद विभागातील उत्तीर्णतेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. २०११मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ५८.५० टक्के होती. त्या वर्षी महसूल विभागाने कॉपीमुक्त अभियान मोठय़ा प्रमाणात हाती घेतले. मागील तीन वर्षांपासून उत्तीर्णतेचा आलेख वाढत चालला आहे. २०१२मध्ये ७१.३६, २०१३मध्ये ८१.१८, तर २०१४मध्ये ८७.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षी त्यात ३ टक्क्य़ांची वाढ झाली.
परीक्षेसाठी ३१ भरारी पथकांची नियुक्ती केली होती. १६० परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. तसेच ४५० बैठे पथकही गठीत करण्यात आले. परीक्षेत ८४ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने होणारी उत्तीर्णतेच्या प्रमाणातील वाढ या वर्षी सर्वाधिक आहे.
परभणीमध्ये मुलींचीच बाजी
वार्ताहर, परभणी
परभणी जिल्ह्याचा दहावीचानिकाल ८२.७४ टक्के  लागला. जिल्ह्यातील २१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी आहे.
जिल्ह्यात या वर्षीही मुलींनी बाजी मारली. एकूण १० हजार ४९० पकी ९ हजार ७७ मुली उत्तीर्ण झाल्या, तर १४ हजार ५४६ मुलांपैकी ११ हजार ६३८ उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८०.०१, तर मुलींचे ८६.५३ टक्के आहे. श्रीस्वामी समर्थ निवासी आश्रमशाळा (पूर्णा), माध्यमिक निवासी आश्रमशाळा (खोरस, तालुका पालम) व उर्दू माध्यमिक शाळा (मनवर कॅम्प, तालुका मानवत) या शाळांचा शून्य टक्के निकाल लागला. जिल्ह्यातील ३९४ शाळांमधील २५ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पकी २० हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यासह ४ हजार ३०, प्रथम श्रेणीत ६ हजार ५८६, द्वितीय श्रेणीत ७ हजार ६२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
२००८-०९ मध्ये जिल्ह्याचा दहावीचा निकाल ६३.७३ टक्के, २००९-१०मध्ये ५५.७९, २०१०-११मध्ये ६४.५७, २०११-१२मध्ये ७१.७६, २०१२-१३मध्ये ७६.०७ टक्के, २०१३-१४मध्ये ७९.१६ टक्के निकाल लागला होता. गेल्या ५ वर्षांत दहावीच्या निकालात प्रगती होत असली, तरी मराठवाडय़ात मात्र परभणी जिल्हा हा सर्वात मागे आहे.
परभणी तालुक्याचा निकाल ८६.६२, पूर्णा ७९.२१ गंगाखेड ८०.५०, पालम ७८.३२, सोनपेठ ७८.२९, जिंतुर ८४.११, पाथरी ७९.४८, मानवत ८०.२०, सेलू ८०.२० टक्के लागला. जिल्ह्यात नऊपकी ७ तालुक्यांच्या ठिकाणी कस्तुरबा बालिका मंदिर शाळा कार्यरत आहेत. या शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : परभणी ६८.४२, पूर्णा ५५.५६, गंगाखेड ८५, जिंतूर ८९.४७, पाथरी ७५, मानवत १०० व सेलू ६२.५०.
सावित्रीच्या लेकींची उस्मानाबादेत बाजी!
वार्ताहर, उस्मानाबाद
दहावीच्या परीक्षेत मागील वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वधारला. जिल्ह्याचा निकाल ८८.४७ टक्के लागला. मागील वर्षी ८४.८६ टक्के निकाल होता. यंदाही बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१२ टक्के आहे.
जिल्ह्यातील ४१२ शाळांमधून एकूण २१ हजार ९२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. पकी २१ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १९ हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींची संख्या ९ हजार १०६, तर मुलांची संख्या १० हजार १७८ आहे. जिल्ह्यातील ५३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १०० टक्के निकालाचा टप्पा गाठणाऱ्या शाळांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली.
गतवर्षी २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. जिल्ह्यात यंदाही भूम तालुक्याने अव्वल स्थान कायम ठेवले. तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.३३ टक्के लागला. गतवर्षी हा निकाल ९१.११ टक्के होता. अन्य तालुक्यांचा निकाल, कंसात गतवर्षीचा निकाल : लोहारा ९१.०३ (८२.२८), परंडा ९५.०७ (८६.९३), उस्मानाबाद ९०.५३ (८६.२१), कळंब ८७.४४ (८२.१०), वाशी ८६.९६ (८३.२५), उमरगा ९१.०३ (८४.९६) तर तुळजापूर तालुक्याचा निकाल ९१.४० (८१.८१) टक्के लागला. जिल्ह्यातील ५३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
विभागात जालना दुसऱ्या क्रमांकावर
वार्ताहर, जालना
दहावीच्या परीक्षेत जालना जिल्हा मंडळाच्या औरंगाबाद विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हय़ात २५ हजार ३६० विद्यार्थ्यांनी नियमित परीक्षेसाठी नोंदणी केली. पैकी २५ हजार २८० परीक्षेस बसले आणि २३ हजार ४४५ म्हणजे ९२.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागाच्या निकालात जालना जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हय़ात १३ हजार ३४४ मुलांनी, तर १० हजार १०१ मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५४, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.३८ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत ५ हजार ५७६, प्रथम श्रेणीत १० हजार १८२, द्वितीय श्रेणीत ७ हजार ६२७ आणि उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ४७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.