दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमातून लातूरला परतलेल्या आठ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. या बाधितांनी बीड जिल्ह्यातून प्रवास करताना त्यांचा दोन नाकाबंदीवरील २९ पोलिसांशी संपर्क आला. त्यामुळे या पोलिसांसह इतर चौघांना रविवारी जिल्हा रुग्णालयातील विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांची करोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र, सोमवारी सायंकाळी या सर्वच्या सर्व पोलिसांची चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल समोर आला. त्यामुळे जिल्ह्याची वाढलेली धाकधूक संपली.

बीड जिल्ह्यातच्या हद्दीवर शहागडजवळ (ता. अंबड, जि. जालना) गेवराई तालुक्यात पोलीस नाका आहे. दिल्लीतील मरकजच्या धार्मिक कार्यक्रमातून परतलेले लातूरचे आठ जण करोनाबाधित आढळले. त्यामुळे औरंगाबादहून बीडमार्गे लातूरला जाताना जिल्ह्यातील दोन पोलीस तपासणी केंद्रावर या बाधितांचा पोलिसांशी संपर्क आला.

३१ मार्च रोजी रात्री दोन वाहनांतून बीड जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर नाकाबंदीवरून त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तरीही प्रवेश न मिळाल्याने शहागडला मुक्का करुण सकाळी सात वाजता ते पुन्हा सीमेवर आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुन्हा त्यांना प्रवेश नाकारला. त्यानंतर ते नागझरीमार्गे बीडमधून चौसाळा (ता.बीड) येथील पोलीस नाक्यावर आले. येथेही पोलिसांनी त्यांची तपासणी केली. त्यामुळे दोन्ही पोलीस नाक्यांवरील पोलीस, आरोग्य व शिक्षक अशा २९ लोकांशी त्यांचा संपर्क झाला होता.

त्यामुळे रविवारी या २९ जणांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यांचा करोनाचा चाचणी अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच धाकधूकही वाढली होती. अखेर सोमवारी सर्वांच्याच चाचण्या निगेटिव्ह आल्याने बीडवासियांनी सुटकेचा श्वास सोडला. बीडमध्ये आजपर्यंत ९८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असून अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे.

मरकजहून आलेल्यांनी २४ तासांत पुढे यावं, अन्यथा कारवाई – जिल्हाधिकारी

दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा यांसह देशाच्या इतर भागात झालेल्या जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने येत्या २४ तासांत स्वतःहून पुढे येऊन माहिती द्यावी. कोणतीही भीती न बाळगता आरोग्य तपासणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.